जोगेश्वरीत शिवसेनिकांची वायकर यांना साथ नाही; शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यामागे खंबीरपणे उभे
By मनोहर कुंभेजकर | Published: March 12, 2024 03:43 PM2024-03-12T15:43:45+5:302024-03-12T15:44:18+5:30
वायकर यांच्या मागे इडीचा ससेमिरा लागल्याने आणि त्यांची अडचण झाल्याने ते शिंदे गटात गेले. मात्र आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असून आम्ही कदापी त्यांची साथ सोडणार नाही.
मुंबई - उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी गेल्या रविवारी रात्री मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मनीषा वायकर आणि कुटुंब उपस्थित होते.मात्र जोगेश्वरीत शिवसेनिकांची वायकर यांना साथ नसून शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे चित्र आहे.
आमदार वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या सोबत जोगेश्वरी पूर्व क्षेत्राचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक,उपविभागप्रमुख,शाखाप्रमुख आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक गेले नाही.तर प्रामुख्याने महिला उपविभागप्रमुख रचना सावंत, रश्मी भावसार,प्रियांका आंबोळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
वायकर यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक अनंत( बाळा ) नर, माजी नगरसेवक जितेंद्र वळवी,उपविभागप्रमुख विश्वनाथ सावंत,शाखाप्रमुख कैलासनाथ फाटक,शाखाप्रमुख संदीप गाढवे आणि इतर पदाधिकारी व शिवसैनिक हे मोठ्या संख्येने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असल्याचे मतदार संघात फेरफटका मारल्यावर आढळून आले.
वायकर यांच्या मागे इडीचा ससेमिरा लागल्याने आणि त्यांची अडचण झाल्याने ते शिंदे गटात गेले. मात्र आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असून आम्ही कदापी त्यांची साथ सोडणार नाही. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांनी गेल्या शनिवारी येथील शिवसेना शाखेच्या भेटी दरम्यान उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहिर केली होती.त्यामुळे या मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने त्यांना मतदान होण्यासाठी दिवसाची रात्र करू असे येथील पदाधिकारी व शिवसैनिकांनी ठणकावून सांगितले.
येथील प्रभाग क्रमांक 77 चे माजी नगरसेवक अनंत (बाळा ) नर यांनी सांगितले की,जोगेश्वरी पूर्व हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेला शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.येथील रहिवाश्यांनी शिवसेनेला आणि आम्हाला प्रेम दिले.आम्ही लहानाचे मोठे येथे झालो.त्यामुळे रहिवाश्यांच्या भावनांची कदर करणे हे आमचे कर्तव्य आहे.त्यामुळे आम्ही निष्ठावान शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.