Join us

औरंगाबाद विमानतळाचे ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे नामकरण करा, वायकरांनी लिहलं मुख्यमंत्र्यांना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 5:44 PM

औरंगाबाद महानगरपालिकेने देखील ‘श्री छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे नामकरण करण्याबाबत सर्वानुमते ठराव संमत करुन तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविलेला आहे अशी माहिती वायकर यांनी पत्रात नमूद केली

मुंबई : औरंगाबाद येथील विमानतळाचे ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे नामकरण करण्यात यावे यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा, अशी विनंती गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्राद्वारे केली आहे. 

संभाजी राजांची हिंदू स्वराज्य निष्ठा, धर्मप्रेम, मुलतत्ववाद देखील वाखाणण्या जोगा होता. मुघलांच्या कोणत्याही अमिषाला बळी न पडता स्वत:ची आहुती देऊन हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी मोलाचा संघर्ष केला. अशा शूर पराक्रमी राजाने आपल्या कृती व आचरणातून एक चांगले उदाहरण त्यांनी जगासमोर ठेवले आहे. या शूर पराक्रमी महाराष्ट्राच्या सुपूत्राचे नाव औरंगाबाद विमानतळास देणे समर्पक व यथोचित होईल, असे मतही वायकर यांनी पत्रात व्यक्त केले आहे. 

२०११ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात १ एप्रिल २०११ रोजी विधानसभा सभागृहात अशासकीय ठराव मांडण्यात आला होता. त्या ठरावाला उत्तर देताना तत्कालीन संसदीय कार्यमंत्र्यांनी सदर अधिवेशन संपण्यापुर्वी मुख्यमंत्री यांच्यासोबत एक बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्र्यांसोबत २१ एप्रिल २०११ रोजी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत औरंगाबाद विमानतळास ‘श्री छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ करण्याबाबत राज्य शासनाने केंद्र शासनाकडे ५ एप्रिल २०१० रोजी ठराव पाठविला होता

या पत्राचा पाठपुराव्यात फारशी प्रगती झालेली दिसून येत नाही. औरंगाबाद महानगरपालिकेने देखील ‘श्री छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे नामकरण करण्याबाबत सर्वानुमते ठराव संमत करुन तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविलेला आहे अशी माहिती वायकर यांनी पत्रात नमूद केली आहे.यासाठी केंद्राकडे यापुर्वीच पाठविलेल्या प्रस्तावाचा मुख्यमंत्री स्तरावरुन पाठपुरावा करावा, अशी विनंती राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्राद्वारे केली आहे. 

टॅग्स :औरंगाबादरवींद्र वायकरविमानतळदेवेंद्र फडणवीस