जोगेश्वरीत शिवसैनिकांची वायकर यांना साथ नाही; उद्धव ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 09:18 AM2024-03-13T09:18:19+5:302024-03-13T09:18:54+5:30
जोगेश्वरीत शिवसैनिकांची वायकर यांना साथ नसून शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी रविवारी रात्री मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मनीषा वायकर आणि कुटुंब उपस्थित होते. मात्र, जोगेश्वरीत शिवसैनिकांची वायकर यांना साथ नसून शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे चित्र आहे.
आमदार वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या सोबत जोगेश्वरी पूर्व क्षेत्राचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख आदी पदाधिकारी गेले नाहीत. महिला उपविभागप्रमुख रचना सावंत, रश्मी भावसार, प्रियांका आंबोळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. वायकर यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक अनंत (बाळा) नर, माजी नगरसेवक जितेंद्र वळवी, उपविभागप्रमुख विश्वनाथ सावंत, शाखाप्रमुख कैलासनाथ फाटक, शाखाप्रमुख संदीप गाढवे आणि इतर पदाधिकारी हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत. आम्ही ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे नर यांनी सांगितले.
‘आम्ही निष्ठावान’
प्रभाग क्रमांक ७७ चे माजी नगरसेवक अनंत (बाळा ) नर यांनी सांगितले की, जोगेश्वरी पूर्व हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेला शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथील रहिवाशांनी शिवसेनेला आणि आम्हाला प्रेम दिले. आम्ही लहानाचे मोठे येथे झालो. त्यामुळे रहिवाशांच्या भावनांची कदर करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही निष्ठावान शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.