ठरले! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रवींद्र वायकर यांना उमेदवारी; मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील
By मनोहर कुंभेजकर | Published: April 12, 2024 07:00 PM2024-04-12T19:00:23+5:302024-04-12T21:07:26+5:30
आधी उमेदवारीला नकार देणाऱ्या नकार देणाऱ्या वायकर यांचे मन वळवण्यात मुख्यमंत्र्यांना अखेर यश आले. काल रात्री वर्षावर त्यांची मुख्यमंत्र्यां बरोबर सविस्तर बैठक झाली.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला असल्याची माहिती सूत्रांनी लोकमतला दिली.
आधी उमेदवारीला नकार देणाऱ्या वायकर यांचे मन वळवण्यात मुख्यमंत्र्यांना अखेर यश आले. काल रात्री वर्षा'वर त्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर सविस्तर बैठक झाली. यावेळी त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला असून त्यांच्या नावाची लवकर घोषणा मुख्यमंत्री करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान आज वायकर यांच्या जोगेश्वरी पूर्व येथील कार्यलयात त्यांनी उत्तर पश्चिम मतदार संघातील शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि माजी नगरसेवकांची बैठक घेवून मतदार संघाची चाचपणी केली. चर्चेदरम्यान ते त्यांच्या उमेदवारी बद्दल बऱ्यापैकी सकारात्मक होते अशी माहिती सूत्रांनी लोकमतला दिली.
वर्षावर 15 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी उत्तर पश्चिम मधील शिंदे सेनेचे पदाधिकारी आणि 17 माजी नगरसेवकांची मध्यरात्री बैठक घेतली होती. त्यावेळी सर्वांनी वायकर यांना उमेदवारी द्यावी अशी विनंती केली होती.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आमदार रवींद्र वायकर यांच्यासह माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत, माजी खासदार संजय निरुपम या राजकीय नेत्यांसह मनोरंजन क्षेत्रातील अभिनेते शरद पोंक्षे, सचिन खेडेकर आदी मराठी कलाकारांची चाचपणी केली होती. अखेर त्यांनी वायकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वायकर यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजपाचा विरोध
जोगेश्वरीच्या जेष्ठ माजी नगरसेविका उज्वला मोडक, येथील भाजप उपाध्यक्ष व राणे समर्थक दत्ता शिरसाट व इतर स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा त्यांना कडाडून विरोध आहे. तसेच त्यांनी दि,10 मार्चला शिंदे गटात प्रवेश केल्यावर त्याच्या सोबत फक्त तीन महिला पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला होता.आणि आजही उद्धव ठाकरे यांच्या बरोबर जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील तमाम शिवसैनिक खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे वायकर यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या समोर कितपत निभाव लागेल, अशी चर्चा येथील नागरिकांमध्ये आहे. महत्वाचे म्हणजे दोघांवरही ईडीची कारवाई झालेली आहे.