रवींद्र वायकर शिंदे गटाच्या वाटेवर?; आज प्रवेश होणार असल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 07:06 AM2024-02-09T07:06:10+5:302024-02-09T08:14:54+5:30
आज प्रवेश होणार असल्याची चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जोगेश्वरी येथील एका पंचतारांकित हॉटेलच्या कथित भूखंड घोटाळ्यावरून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीचा ससेमिरा मागे लागलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचा शुक्रवारी वाढदिवस असून, त्याचे निमित्त साधून वायकर यांचा प्रवेश घडविला जाण्याची जोरदार चर्चा आहे.
याबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही पक्षांतरासाठी वायकर यांच्यावर प्रचंड दबाव असल्याचा आरोप केला आहे. येत्या काही दिवसांत शिवसेना सोडा, पक्षांतर करा नाहीतर तुरुंगात जा, असे त्यांना धमकावले जात आहे. हा एक प्रकारे दहशतवाद आहे, असे राऊत म्हणाले. ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून वायकर ओळखले जातात.
कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीने वायकर यांच्या निवासस्थानी तसेच मातोश्री क्लबवर धाडी टाकल्या होत्या.
आर्थिक गुन्हे शाखेकडूनही वायकर यांची चौकशी सुरू असून, गुन्हे शाखेने वायकर यांच्यासह त्यांच्या पत्नी मनीषा वायकर आणि व्यावसायिक भागीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
या पक्ष प्रवेशापूर्वी वायकर यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची गुप्तपणे भेट घेतल्याचे बोलले जाते. या भेटीत चर्चा होऊन वायकर यांना पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय झाल्याचे समजते. वायकर यांच्याशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र होऊ शकला नाही.