रवींद्र वायकरांना खासदार म्हणून शपथ देऊ नये; लोकसभेच्या सरचिटणीसांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 10:18 AM2024-06-20T10:18:05+5:302024-06-20T10:20:37+5:30

Ravindra Waikar : लोकसभा सरचिटणीस उत्पलकुमार सिंग यांना इमेलद्वारे सुद्धा ही नोटीस पाठवण्यात आल्याचे ॲड. असीम सरोदे यांनी सांगितले.

Ravindra Waikar should not be sworn in as MP; Notice to the General Secretary of the Lok Sabha | रवींद्र वायकरांना खासदार म्हणून शपथ देऊ नये; लोकसभेच्या सरचिटणीसांना नोटीस

रवींद्र वायकरांना खासदार म्हणून शपथ देऊ नये; लोकसभेच्या सरचिटणीसांना नोटीस

मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे रवींद्र वायकर अवघ्या ४८ मतांनी विजयी झाल्यानंतर विरोधकांनी सवाल उपस्थित केले. दरम्यान, रवींद्र वायकर यांचे लोकसभा निवडणूक जिंकणे वादग्रस्त व शंकास्पद आहे, येथे पारदर्शक व कायदेशीर वातावरणात मतमोजणी झालेली नाही. त्यामुळे त्यांना लोकसभेत खासदार म्हणून शपथ देऊ नये, अशी मागणी उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढलेले हिंदू समाज पार्टीचे उमेदवार भरत शाह यांनी ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत लोकसभा सरचिटणीस उत्पलकुमार सिंग यांना नोटीस पाठवून केली आहे. 

लोकसभा सरचिटणीस उत्पलकुमार सिंग यांना इमेलद्वारे सुद्धा ही नोटीस पाठवण्यात आल्याचे ॲड. असीम सरोदे यांनी सांगितले. या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, भारतात पहिल्यांदा ईव्हीएम मशीन मतमोजणीबाबत एफआयआर दाखल झाला आहे. त्यामुळे रवींद्र वायकर यांना आर्टिकल ९९ नुसार खासदारकीची शपथ देणे म्हणजे संविधान प्रक्रिया अपवित्र करण्याची परवानगी देणे ठरेल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. 

नोटीसपत्रात हे सुद्धा नमूद करण्यात आले आहे की, अशी मागणी यापूर्वी कुणी केली नसेल तरीही आपण शपथ देण्यामागील संविधानाचा उद्देश लक्षात घेऊन सकारात्मक कृती म्हणून रवींद्र वायकर यांना खासदारकीची शपथ देऊ नये. उमेदवाराचा नातेवाईक मतमोजणी प्रक्रिया सुरु असलेल्या ठिकाणी मोबाईल फोन घेऊन हजर असतो तो फोन ईव्हीएम मशीनसोबत जोडलेला होता, असा आरोप झाल्यावर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आणि तपास / चौकशी आहे. 

ईव्हीएमद्वारे होणाऱ्या मतदान व मतमोजणी प्रक्रियेत ठरवून व काही निवडक मतदारसंघात गैरवापर करायचा, त्यासाठी काही सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरायचे आणि भाजपला सोयीचा निकाल येण्याची व्यवस्था करायची अशी चर्चा अनेकदा होत असतांना यावेळी प्रथमच अश्याच संदर्भात एफआयआर दाखल झालेला आहे. त्यामुळे ज्या रवींद्र वायकर यांचे निवडून येणे प्रथमदर्शनीच शंकास्पद आहे त्यांना खासदारकीची शपथ देऊ नये, अशी मागणी थेट लोकसभा सरचिटणीस उत्पलसिंग यांच्याकडे हिंदू समाज पार्टीच्या भरत शाह यांनी केली आहे.

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नेस्को सेंटर या मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्याचे मुद्दाम टाळण्यात येत आहे. ही वस्तुस्थिती हेच दाखविणारी आहे की सरकारी यंत्रणा सत्य लपविण्यासाठी रवींद्र वायकर यांना एकनाथ शिंदे व केंद्र सरकारच्या दबावाखाली मदत करीत आहे, असेही भरत खिमजी शाह यांनी नमूद केले आहे. तसेच, निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गांचा वापर करण्याच्या या उघड प्रकरणी दाद मागण्यासाठी भरत खिमजी शाह यांनी ऊच्च न्यायालयात इलेक्शन पिटिशन दाखल करणार असल्याचे सुद्धा जाहीर केले आहे.
 

Web Title: Ravindra Waikar should not be sworn in as MP; Notice to the General Secretary of the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.