लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उद्धवसेनेचे नेते अमोल कीर्तिकर यांच्या निवडणुकीतील मतमोजणीशी संबंधित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी शिंदेसेनेचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांना समन्स बजावले. अवघ्या ४८ मतांनी पराभूत झालेल्या कीर्तिकर यांनी वायकर यांच्या खासदारकीलाच आव्हान दिले आहे.
मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून आपल्यालाच विजयी घोषित करावे, अशी मागणी कीर्तिकर यांनी केली आहे. न्या. संदीप मारणे यांच्या एकलपीठाने या प्रकरणाची सुनावणी २ सप्टेंबर रोजी ठेवली आहे.
न्यायालयाने वायकर आणि इतरांना कीर्तिकर यांच्या आरोपांबाबत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. आपल्या एजंटला निवडणूक अधिकाऱ्याच्या टेबलाजवळ बसू दिले नाही. कमी मतांच्या फरकाने निवडणूक हरल्यानंतर उमेदवाराला फेरमतमोजणीचा अधिकार असतानाही तो नाकारला गेल्याचा आरोप आहे.
आपल्याला हरवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. निवडणूक अधिकाऱ्यांनी अनेक त्रुटी ठेवल्या आहेत, असे कीर्तिकर यांनी याचिकेत म्हटले आहे.
कीर्तिकर यांचे आरोप कोणते?
निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रियेत अनेक त्रुटी ठेवल्या. फेरमतमोजणीसाठी अर्ज करण्यास निवडणूक अधिकाऱ्यांनी नकार दिला. तसेच, मोबाइल नेण्यास मनाई असलेल्या क्षेत्रात वायकरांच्या निकटवर्तीयांना मोबाइल नेण्यास परवानगी दिली, असा आरोप कीर्तिकर यांनी याचिकेत केला आहे.