Join us

उत्तर-पश्चिम मुंबईमधून शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना मिळणार उमेदवारी!

By मनोहर कुंभेजकर | Published: April 28, 2024 4:13 PM

Lok Sabha Elections 2024 : मंगळवारी रवींद्र वायकर निवडणूक अर्ज भरणार आहे.

मुंबई : उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून शिंदे गटाकडून महायुतीचे उमेदवार म्हणून जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज किंवा उद्या वायकर यांची उमेदवारी येथून जाहीर करणार आहेत. विशेष म्हणजे येत्या मंगळवारी रवींद्र वायकर निवडणूक अर्ज भरणार आहे. रवींद्र वायकर यांच्या साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती ताकदीने या निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी उतरणार आहे.

या मतदार संघातून आमदार रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरे गटातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, लोकमतच्या प्रतिनिधीने रवींद्र वायकर यांची जोगेश्वरी पूर्व येथील मातोश्रीत क्लब मध्ये भेट घेतली असता सकाळपासूनच येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या हितचिंतकांनी आणि महिलांनी एकच गर्दी केली आणि त्यांना निवडणूकीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी वायकर सकारात्मक आणि निवडणूकीसाठी सज्ज असल्याचे दिसून आले.

रवींद्र वायकर यांनी सांगितले की, खरंतर मी सुरवातीला लढायला नकार दिला. माझे आणि माझ्या पत्नीच्या नाव चर्चेत होते. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अखेर परवा निवडणूक लढण्यास तयार असल्याचा मुख्यमंत्र्यांना होकार दिला. आज किंवा उद्या माझी उमेदवारी जाहीर होणार आहे. यानंतर मी येत्या मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार आहे, रवींद्र वायकर यांनी सांगितले. 

या मतदार संघात अंधेरी पश्चिममधून आमदार अमित साटम, वर्सोव्यातून आमदार डॉ.भारती लव्हेकर, गोरेगावच्या आमदार विद्या ठाकूर हे भाजपाचे तीन आमदार असून स्वतः शिंदे गटाचे आमदार रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात. तर दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू आणि अंधेरी पूर्वच्या आमदार ऋतुजा लटके हे ठाकरे गटाचे दोन आमदार असे या मतदारसंघात आहेत. तर अमोल कीर्तिकर यांचे वडील व शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर या लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात.

टॅग्स :मुंबई उत्तर पश्चिममहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४रवींद्र वायकर