Join us

रवींद्र वायकरांचे ५०० कोटींचे अलिशान हॉटेल पाडणार; किरीट सोमय्या ठाकरे गटाच्या हात धुवून मागे लागले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 1:54 PM

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार नगरविकास मंत्रालयाने मुंबई महानगरपालिकेला या संबंधी कारवाई करण्यासाठी निर्देश दिले आहेत.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या शिवसेनेच्या नेत्यांच्या हात धुवून मागे लागले आहेत. मिलिंद नार्वेकर, अनिल परबांनंतर आता उद्धव ठाकरेंचे खास रवींद्र वायकर यांच्यावर कारवाईसाठी प्रयत्न करत आहेत. रवींद्र वायकर यांच्या मालमत्तांची सीबीआयने चौकशी करावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. 

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आशिर्वादाने २०२१ मध्ये वायकर यांना जोगेश्वरीच्या व्यारवली गावात २ लाख स्के. फु. चे ५ स्टार हॉटेल बांधकाम करण्याची परवानगी मुंबई महापालिकेने दिली होती. ही जागा खेळाचे मैदान म्हणून आरक्षित होती. या ठिकाणी वायकर यांनी ५०० कोटींच्या किंमतीचे हॉटेल उभारले आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला. 

वायकर यांनी या जागेवर ९ फेब्रुवारी २००४ रोजी खेळाच्या मैदानाचा १५%, काही भाग स्पोर्ट्स एज्युकेशन सेंटर म्हणून विकसित करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यासमोरच्या जमिनीवर कायमचे मैदान आरक्षित ठेवण्यात येणार होते. रिक्रिएशन ग्राऊंडम्हणून त्याचा वापर केला जाईल असे वचन वायकरांनी पालिकेला दिले होते. याबाबत महापालिका, वायकर आणि महल पिक्चर्स प्रा. लि. या अविनाश भोसले व  शहीद बालवा यांच्या मालकीची कंपनीसोबत करारही झाला होता. या भागावर भविष्यात कधीही रवींद्र वायकर त्यांची कंपनी हक्क सांगणार नाही, बांधकाम, डेव्हलपमेंट राईट मागणार नाही, अशा प्रकारचा करार करण्यात आला होता. म्हणजेच उर्वरित मैदान हे महानगरपालिकेचे मैदान झाले होते. २०२१ मध्ये रवींद्र वायकर यांनी ही गोष्ट लपवली, मुंबई महापालिकेची फसवणूक केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. 

ही गोष्ट मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाही माहिती होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही माहिती होती तरी देखील ५०० कोटी रुपयांचे ५ स्टार हॉटेलसाठी ही जागा वापरण्यासाठी उद्धव ठाकरे , मुंबई महानगरपालिकेने परवानगी दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. गेली २ वर्षे या विषयावर मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र सरकार यांच्याशी आम्ही पाठपुरावा करित होतो. सप्टेंबर २०२२ नंतर या विषयावर चौकशी सुरु झाली आणि मुंबई महानगरपालिकेने २१ फेब्रुवारी २०२३ रोजी या संबंधात रवींद्र वायकर यांना नोटीस दिली, स्पष्टीकरण मागविले असल्याचे सोमय्या म्हणाले. 

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार नगरविकास मंत्रालयाने मुंबई महानगरपालिकेला या संबंधी कारवाई करण्यासाठी निर्देश दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेने आता १५ जून २०२३ रोजी वायकर यांना या हॉटेलची परवानगी रद्द करण्यात येत आहे, असा आदेश दिला आहे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :किरीट सोमय्यारवींद्र वायकरशिवसेना