लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधामुळे जलपर्यटनाचे चाक खोलात रुतले. पर्यटकांअभावी मे ते जुलैदरम्यान सेवा बंद करावी लागल्याने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. मात्र, राज्य सरकारने कोरोनाबाबतच्या नियमांत शिथिलता दिल्यापासून हळूहळू पर्यटकांची संख्या वाढू लागल्यामुळे या क्षेत्रात आशेचा किरण दिसू लागला आहे. १ सप्टेंबरपासून गेटवे ते मांडवा नियमित फेरीसेवा सुरू करण्यात आल्याने प्रतिसाद आणखी वाढण्याची शक्यता फेरीबोट व्यावसायिकांनी व्यक्त केली.
दुसऱ्या लाटेचा जोर ओसरताच ५ ऑगस्टपासून एलिफंटा आणि हार्बर क्रूझसाठी फेरीबोटी सुरू करण्यात आल्या. सुरुवातीला २५ बोटी या मार्गावर उतरविण्यात आल्या. हळूहळू पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने १ सप्टेंबरपासून पूर्ण क्षमतेने सेवा सुरू करण्यात आली आहे. आता एलिफंटासह गेटवे ते मांडवा या मार्गावरही नियमित वाहतूक सुरू राहील, अशी माहिती गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थेचे सरचिटणीस मामू मुल्ला यांनी दिली.
निर्बंधात शिथिलता दिल्यापासून गेल्या काही दिवसांत पर्यटकांच्या संख्येत ५० टक्के वाढ झाली आहे. गेटवे ते एलिफंटा मार्गावर प्रतिदिन चार हजार पर्यटक ये-जा करीत आहेत. तर मांडवाची सेवा सुरू झाल्याने ही संख्या सात हजारांवर पोहोचली आहे. पर्यटक वाढत असल्याने व्यवसायाचे चक्र सुरू झाले आहे. त्याने कोरोनाकाळातील तूट भरून काढता येणे शक्य नसले तरी प्रत्येकाच्या हाताला काम मिळत असल्याचे समाधान आहे. लोकल रेल्वे सर्वांसाठी खुली केल्यास स्थितीत आणखी सुधारणा होईल. फक्त तिसऱ्या लाटेच्या धास्तीने सरकारने निर्बंधात आणखी वाढ करू नये; अन्यथा व्यावसायिक उद्ध्वस्त होईल, अशी भीती मुल्ला यांनी व्यक्त केली.
.............
तिकीट दरांत वाढ नाही
कोरोनाकाळात व्यवसायात झालेला तोटा आणि इंधन दरवाढीची झळ बसत असल्याने फेरीबोटींच्या तिकीट दरात वाढ करण्याची परवानगी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडे मागितली आहे. परंतु, अद्याप त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे सध्यातरी भाडेवाढ केलेली नाही. सध्या गेटवे ते एलिफंटा फेरीसाठी प्रतिव्यक्ती २२५ रुपये (रिटर्न), तर गेटवे ते मांडवाकरिता १३५ रुपये (वन वे) तिकीट दर असल्याची माहिती मामू मुल्ला यांनी दिली.