RBI gets threat : मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) धमकीवजा फोन आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कस्टमर केअर नंबरवर हा धमकीचा कॉल करण्यात आला होता. तसेच, कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वत: दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा सीईओ असल्याचे म्हटले आहे.
शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कस्टमर केअर नंबरवर हा कॉल आला होता. फोनवरील व्यक्तीने सांगितले होते, मी लष्कर-ए-तैयबाचा सीईओ आहे. मागचा रस्ता बंद करा, इलेक्ट्रिक कार खराब झाली आहे, असे सांगत त्याने फोन ठेवून दिला.
या घटनेची गंभीर दखल घेत रिझर्व्ह बँकेच्या सुरक्षा रक्षकाने दिलेल्या फिर्यादीनुसार माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे कृत्य कोणीतरी केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मुंबईतील लॉ फर्मलाही मिळालेली धमकीयाआधी गुरुवारी (१४ नोव्हेंबर) मुंबईतील जेएसए लॉ फर्म बॅलार्ड पेअर आणि जेएसए कार्यालय कमला मिल लोअर पर्ल यांना बॉम्बची धमकी देणारा ईमेल मिळाला होता. या धमकी देणाऱ्या मेल कंपनीच्या ईमेल आयडीवर फरझान अहमद असे नाव लिहिले होते. जेएफए फर्मच्या कार्यालयात आणि बॅलार्ड इस्टेटच्या कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचे या मेलमध्ये लिहिले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
याआधीही धमकीची प्रकरणेगेल्या दोन-तीन महिन्यांपासून शाळा, हॉटेल, विमानतळ, बाजारपेठ, रेल्वे, बस आदी ठिकाणी बॉम्बच्या धमक्या सातत्याने वाढत आहेत. २७ ऑक्टोबर रोजी मुंबई विमानतळावर एका CISF जवानाला धमकी देण्यात आली होती. त्यावेळी, विमानाला उडवले तर कोणीही वाचणार नाही, असे सांगण्यात आले होते. यानंतर तपासात ही धमकी खोटी असल्याचे निष्पन्न झाले होते.