मुंबई : तेल कंपनीच्या भूमिगत पाइपलाइनमधून डिझेल चोरी करून पुणे आणि गुजरातमध्ये विक्री करणा-या रॅकेटचा आर.सी.एफ. पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पुणे आणि गुजरातच्या तीन व्यावसायिकांसह ९ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या टोळीने आतापर्यंत ६२ लाख किमतीचे १ लाख ४ हजार ६०० लीटर डिझेलची चोरी केल्याचे उघडकीस आले असून, ८ फरार आरोपींचा शोध सुरू आहे.चेंबूरच्या गव्हाणपाडा येथील बी.पी.सी.एल. कंपनीच्या भिंतीलगत टँकर पार्किंग करण्याच्या जागेत एच.पी.सी.एल. कंपनीच्या डिझेलच्या भूमिगत पाइपलाइन आहेत. याचाच फायदा घेत तेल माफिया येथून डिझेल चोरी करत असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त आर.बी. माने यांना मिळाली.पोलीस आल्याचा सुगावा लागताच तेल माफियांनी पळ काढला. भूमिगत पाइपलाइनमधून डिझेल चोरी होत असल्याची खात्री पोलिसांना पटली. एच.पी.सी.एल. कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापक चिंतामणी कणेकर यांच्या तक्रारीवरून तपास सुरू झाला. गोवंडी, मानखुर्द, चेंबूर, घाटकोपरमधून हासिम चौधरी (३०), रियाज रोजन खान (२५), किशोर सिरसोदे (३३), दीपक मुनीराज (२३) आणि अब्दुल सलीम शेख (४९) यांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून पुण्यातून परवेझ, नासीर मोहम्मद अन्सारी तर गुजरातमधून काझीम गोवाणी, सल्लाउद्दिन अहमद शेख उर्फ हड्डी याला पोलिसांनी अटक केली.
चेंबूरमधील डिझेलची पुणे, गुजरातला विक्री करणा-या रॅकेटचा आर.सी.एफ. पोलिसांनी केला पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 5:30 AM