मेट्रो ३च्या तपासणीला आरडीएसओकडून सुरुवात; येत्या दोन महिन्यांत सेवेत दाखल होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 10:17 AM2024-06-11T10:17:02+5:302024-06-11T10:22:20+5:30
कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिका सुरू होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे.
मुंबई : कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिका सुरू होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे. आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यातील मार्गिकेच्या तपासणीला रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) संस्थेमार्फत सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दीड ते दोन महिन्यांत ही मार्गिका मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
मेट्रो ३ मार्गिकेचा आरे ते बीकेसी हा मार्ग पहिल्या टप्प्यात सेवेत दाखल केला जाणार असून या मार्गावरील इंटिग्रेटेड ट्रायल रन नुकत्याच पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या मेट्रो मार्गिकेच्या संचालनासाठी विविध यंत्रणांकडून प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार मेट्रो मार्गिकेच्या तपासणीसाठी ‘आरडीएसओ’ संस्थेतील जॉइंट डायरेक्टर पदाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली १२ अधिकाऱ्यांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. त्यांच्याकडून या मेट्रो मार्गिकेच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत, तर आरडीएसओ पथकाकडून ‘ऑसिलेशन’ चाचण्या घेतल्या जात आहेत.
आरडीएसओ पथकाकडून पुढील एक ते दोन आठवडे या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. या चाचण्यांमधून अपेक्षित निष्कर्ष निघाल्यास आरडीएसओ पथकाकडून मेट्रो यंत्रणेला प्रमाणित केले जाईल, तसेच मेट्रो सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला जाईल. त्यानंतर एमएमआरसीकडून कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (सीएमआरएस) पथकाला मार्गिकेच्या तपासणीसाठी बोलाविले जाणार आहे, अशी माहिती एमएमआरसीने दिली.
या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील आरे-बीकेसी मार्गिकेसाठी नऊ गाड्यांची गरज आहे. या गाड्या वर्षभरापूर्वीच दाखल झाल्या आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण मार्गिकेचे संचलन करण्यासाठी आणखी ११ गाड्या एमएमआरसीला मिळाल्या आहेत. मेट्रो ३ मार्गिकेसाठी ३७,००० कोटी रुपये खर्च येणार आहे.
कोणत्या चाचण्या घेतल्या जाणार?
१) मेट्रो गाडी योग्य पद्धतीने धावत आहे का, तसेच गाडी वेगवेगळ्या वेगाने धावत असताना प्रवास सुसह्य होत आहे का, याची तपासणी आरडीएसओ करणार आहे.
२) त्याचबरोबर मेट्रोची ब्रेक यंत्रणा आणि ट्र्रॅक्शन परफॉर्मन्स यांच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.