पुनर्मूल्यांकनाचा वेग दिवाळीमुळे मंदावला, आॅनलाइन उत्तरपत्रिकांचा गोंधळ अजूनही संपलेला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 07:05 AM2017-10-23T07:05:22+5:302017-10-23T07:05:26+5:30
मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिकांचा गोंधळ अजूनही संपलेला नाही. आॅक्टोबर महिन्यांत होणारी परीक्षा या गोंधळामुळे नोव्हेंबर महिन्यात ढकलण्यात आली आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिकांचा गोंधळ अजूनही संपलेला नाही. आॅक्टोबर महिन्यांत होणारी परीक्षा या गोंधळामुळे नोव्हेंबर महिन्यात ढकलण्यात आली आहे. पण, दिवाळीच्या सुटीत परीक्षा विभागातील काम थंडावल्याने या चार दिवसात एकही निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा पुनर्मूल्यांकनाच्या निकालाचे काम मंदावल्याचे दिसून आले आहे.
विद्यापीठात मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या परीक्षांचे निकाल लावण्यासाठी उत्तरपत्रिका आॅनलाइन पद्धतीने तपासण्यात आल्या. पण, या पद्धतीत झालेल्या गोंधळामुळे १९ सप्टेंबरला विद्यापीठाने ४७७ निकाल जाहीर करण्यात यश मिळवले. पण, तरीही विद्यापीठाची निकालातून सुटका झालेली नाही. अजूनही विद्यापीठाला तब्बल २४ हजारहून अधिक पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करायचे आहेत.
मुंबई विद्यापीठ नोव्हेंबर महिन्यात परीक्षा घेणार आहे. या परीक्षांच्या उत्तरपत्रिकाही आॅनलाइन पद्धतीने तपासल्या जाणार आहेत. त्यामुळे हे निकाल लवकरच लागावेत या मागणीने जोर धरला आहे. पण, आता विद्यापीठ अजूनही हजारो निकाल जाहीर करत नसल्याने गोंधळ वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
>निकाल परीक्षांच्या आधी
हजारो विद्यार्थ्यांना अजूनही पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे नुकसान कमी करण्यास पुनर्मूल्यांकनांचे निकाल वेळेवर लावणे गरजेचे असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. नोव्हेंबरमधील परीक्षांच्या आधी निकाल जाहीर करू, असे विद्यापीठाचे म्हणणे आहे.