पुनर्मूल्यांकनही फसले, २५ हजार निकाल अजूनही रखडलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 04:30 AM2017-11-09T04:30:15+5:302017-11-09T04:30:39+5:30

मुंबई विद्यापीठात हिवाळी सत्राच्या परीक्षा सुरू झाल्या असल्या, तरी अजूनही विद्यार्थ्यांना उन्हाळी सत्राच्या परीक्षांचे निकाल मिळालेले नाहीत.

The re-evaluation is still in progress, 25 thousand results are still pending | पुनर्मूल्यांकनही फसले, २५ हजार निकाल अजूनही रखडलेले

पुनर्मूल्यांकनही फसले, २५ हजार निकाल अजूनही रखडलेले

googlenewsNext

मुंबई : मुंबई विद्यापीठात हिवाळी सत्राच्या परीक्षा सुरू झाल्या असल्या, तरी अजूनही विद्यार्थ्यांना उन्हाळी सत्राच्या परीक्षांचे निकाल मिळालेले नाहीत. राखीव आणि पुनर्मूल्यांकनाच्या निकालांनाही आता लेटमार्क लागत असल्यामुळे एटीकेटी परीक्षांचे काय? असा यक्षप्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. मुंबई विद्यापीठात सद्यस्थितीत तब्बल २५ हजार पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर झाले नसल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत.
मुंबई विद्यापीठात मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या ४७७ परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आॅनलाइन पद्धतीने करण्यात आले. या आॅनलाइन मूल्यांकनाचा फटका विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. सर्वसाधारणपणे जून महिन्याच्या अखेरपर्यंत विद्यापीठाचे सर्व निकाल जाहीर होतात, पण यंदा उन्हाळी परीक्षांचे सर्व निकाल जाहीर होण्यास १९ सप्टेंबर उजाडला. तरीही सर्व विद्यार्थ्यांच्या हाती निकाल मिळालेले नाहीत.
आॅनलाइन मूल्यांकन पद्धतीत आलेल्या तांत्रिक अडचणी, प्राध्यापकांना वेळेवर न मिळालेले प्रशिक्षण, यामुळे उत्तरपत्रिका तपासणीची गती मंदावली होती. त्यानंतरही विद्यापीठाने पुनर्मूल्यांकनाच्या तपासणीसाठी आॅनलाइन पद्धतीचा मार्ग स्वीकारला.
आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत अनेक गोंधळ झाले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले असल्याने यंदा पुनर्मूल्यांकनाचा टक्का वाढला. आता पुनर्मूल्यांकनाच्या निकालामध्ये हा गोंधळ समोर येत आहे. बीकॉमच्या एका विद्यार्थ्याला मुख्य निकालात फक्त ५ गुण मिळाले होते. या विद्यार्थ्याने पुनर्मूल्यांकनासाठी टाकल्यावर त्या विद्यार्थ्याला ४५ गुण देण्यात आले आहेत. अशाच प्रकारे अन्य विद्यार्थीही उत्तीर्ण असू शकतात. त्यांचे शैक्षणिक भवितव्य या निकालावर अवलंबून असल्याने निकाल लवकर जाहीर करावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. पुनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर न झाल्याने एका विद्यार्थ्याची सनद हुकली. गेल्या दोन महिन्यांपासून हा विद्यार्थी पुनर्मूल्यांकनाच्या निकालाचा पाठपुरावा करीत आहेत, पण त्याची उत्तरपत्रिका तपासली नसल्याने त्याची सनद गेली आहे.
विद्यार्थ्यांनी या आधी आंदोलने केली, तेव्हा फक्त आश्वासने मिळाली आहेत. नोव्हेंबर महिन्यात केलेल्या आंदोलनाच्या वेळी हिवाळी परीक्षा सुरू होण्याआधी निकाल जाहीर केले जातील, असे आश्वासन देण्यात आले होते, पण अजूनही हजारो विद्यार्थी हे निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या प्रकरणी योग्य ती कारवाई करावी, असे पत्र विधि अभ्यासक्रमाचा विद्यार्थी अमेय मालशे यांनी विद्यापीठाला लिहिले आहे.
विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्यानंतर विद्यापीठाची धुरा प्रभारी खांद्यावर आली आहे. त्यातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांची मुदत १६ नोव्हेंबरला संपणार होती, पण आता त्यांना मुदतवाढ मिळणार आहे. आता त्यांना पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ मिळणार आहे.

आॅनलाइन तपासणीचा विद्यार्थ्यांना फटका
477 परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आॅनलाइन पद्धतीने करण्यात आले आहे. या आॅनलाइन तपासणीचा फटका विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.

19 सप्टेंबर उजाडला, तरीही विद्यापीठाला उन्हाळी परीक्षांचे सर्व निकाल जाहीर करता आलेले नाहीत. पुनर्मूल्यांकन रखडले आहे.

25 हजार पुनर्मूल्यांकनाचे नकाल अजूनही लागले नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. आश्वासनांवर विसंबून न राहता निकाल हाती मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

Web Title: The re-evaluation is still in progress, 25 thousand results are still pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.