Join us  

माझगावच्या धोकादायक इमारतींची पुन्हा पाहणी

By admin | Published: April 13, 2017 3:20 AM

माझगाव येथील १६ इमारती धोकादायक ठरविण्यात आल्याने तेथील शेकडो कुटुंबे हवालदिल झाली आहेत. मात्र या इमारतींची दुरुस्ती शक्य असल्याचा दावा सभागृह

मुंबई : माझगाव येथील १६ इमारती धोकादायक ठरविण्यात आल्याने तेथील शेकडो कुटुंबे हवालदिल झाली आहेत. मात्र या इमारतींची दुरुस्ती शक्य असल्याचा दावा सभागृह नेते यशवंत जाधव यांनी स्थायी समितीत केला. त्यामुळे या इमारती धोकादायक आहेत का? याची शहानिशा करण्यासाठी पाहणी करण्याचा आग्रह त्यांनी धरला. त्यानुसार या इमारतींचा पाहणी अहवाल पालिका प्रशासन तयार करणार आहे. माझगाव येथे महापालिकेच्या वसाहती आहेत. यापैकी काही इमारती ब्रिटिशकालीन असल्याने धोकादायक स्थितीत आहेत. यामुळे महापालिकेने नोटीस बजावून कारवाईला सुरुवात केली. मात्र या इमारतींची चाचपणी स्थानिकांनी अन्य मार्गाने केली असता या इमारतींची दुरुस्ती शक्य असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करून इमारतींच्या स्थैर्यतेची चाचपणी करण्यात यावी, यासाठी पाहणी करण्याची मागणी यशवंत जाधव यांनी केली. याबाबत माहिती देताना अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी ४५ टक्क्यांपर्यंत कमकुवत असलेल्या इमारतींची दुरुस्ती करण्यात येते, असे स्पष्ट केले. मात्र ४५ टक्क्यांहून अधिक धोकादायक आढळणाऱ्या इमारती पाडूनच त्यांची पुनर्बांधणी केली जात असल्याचे सांगितले. त्यानुसार या इमारतींची पाहणी करून स्थायी समितीपुढे त्याचा अहवाल ठेवल्यानंतर या धोकादायक इमारतींचे भवितव्य ठरणार आहे. (प्रतिनिधी)१९२२चे बांधकाममाझगाव ताडवाडीतील १६ इमारती या बॉम्बे इम्प्रूव्हमेन्ट ट्रस्टमार्फत १९२२मध्ये बांधण्यात आल्या आहेत. या इमारतींमध्ये हजाराहून अधिक रहिवासी राहतात. यामध्ये काही इमारती सी-१ म्हणजे अतिधोकादायक यादीत असल्याने येथील नागरिकांना इमारत रिकामी करण्यास भाग पाडण्यात येत आहे. या रहिवाशांना माहुल येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. मात्र यासाठी रहिवासी तयार नाहीत. त्यामुळे येथील इमारतींचा वीजपुरवठा व पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई पालिकेने केली होती.