जलसंधारण विभागाची फेरपरीक्षा जुलैमध्ये; अमरावतीत घडले होते गैरप्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 05:45 AM2024-06-23T05:45:10+5:302024-06-23T05:46:51+5:30
६७० पदांसाठीची फेरपरीक्षा जुलै महिन्यात होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जलसंधारण अधिकारी
(स्थापत्य) गट ब संवर्गातील ६७० पदांसाठीची फेरपरीक्षा जुलै महिन्यात होणार आहे. अमरावतीच्यापरीक्षा केंद्रावरील गैरप्रकारानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता १४, १५, १६ जुलै रोजी फेरपरीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांनी दिली.
मृद व जलसंधारण विभागाच्या जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट- ब संवर्गातील ६७० पदांसाठीची फेरपरीक्षा आढावा बैठक मंत्रालयात आयोजित केली होती. त्यावेळी मंत्री संजय राठोड, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील, टीसीएस कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील ६७० पदे सरळसेवेने भरण्यासाठी १९ डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परीक्षा २० व २१ फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये झाली. परीक्षेदरम्यान २१ फेब्रुवारी रोजी नांदगाव पेठ, अमरावती शहर येथील परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडल्याचे निदर्शनास आले.
अधिकृत केंद्रावरच परीक्षा होणार : राठोड
- १४, १५ व १६ जुलै रोजी होणारी फेरपरीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या सात शहरांतील एकूण १० टीसीएस-आयओएन या कंपनीच्या अधिकृत केंद्रावरच घेण्यात येणार आहेत.
- परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र इ. बाबत सर्व उमेदवारांना स्वतंत्ररीत्या कळविण्यात येणार आहे. पूर्ण सुरक्षित तंत्रज्ञानासह जिल्हाधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली ही परीक्षा होणार आहे.
- यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडून आल्यास संबंधितास जबाबदार ठरवून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही मंत्री राठोड म्हणाले.