मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरात आता कोरोना परिस्थितीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. मात्र सुरक्षेच्या कारणात्सव मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल सर्वसामान्यांसाठी नव्या वर्षातच सुरु होणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे. त्यामुळे लोकल सुरक्षेच्या कारणात्सव आता सुरु करणे योग्य नसल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितल्याने चाकरमान्यांना आणखी पुढील काही दिवस पर्यायी वाहतूकीने प्रवास करावा लागणार आहे.
कोरोनाला नियंत्रित ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून चाचण्यांची संख्या वाढवण्यासोबतच रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तिंची चाचणी व पडताळणी सातत्याने करण्यात येत आहे. महापालिकेने केलेल्या उपाय योजनांमुळे दिल्लीच्या तुलनेत मुंबईने कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविले आहे. मात्र नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. याचपार्श्वभूमीवर इकबाल चहल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी केली आहे.
एका मराठी वृत्तावाहिनीच्या वृत्तानूसार, महापालिकेने शहरातील इतरही नाईट क्लबवर धाडी टाकल्या आहेत. यावेळी, नाईट क्लबमध्ये हजारो लोक विनामास्क असल्याचे आढळले. ही सर्व परिस्थिती पाहता, मुंबईत पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी इकबाल चहल यांनी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र राज्य सरकारकडून २५ डिसेंबरनंतर मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेऊन, याबाबत निर्णय घेऊ, असं सांगण्यात आल्याचे इकबाल चहल यांनी माहिती दिली आहे.
दरम्यान, गणेशोत्सवात नागरिक मोठया प्रमाणावर बाहेर पडल्याने कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला होता. परिणामी दसरा आणि दिवाळीदरम्यान नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन पालिकेने केले होते. दसऱ्याला नागरिकांनी महापालिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला देखील; मात्र दिवाळीदरम्यान नागरिक मोठया प्रमाणावर घराबाहेर पडले.
परिणामी मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी भीती व्यक्त केली गेली. यावर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने दिवाळीनंतर परराज्यातून मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचण्या सुरु केल्या. कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी इतर उपाय योजनाही हाती घेतल्या. याचा सकारात्मक परिणाम म्हणून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे.