‘पुन्हा जुळल्या रेशीमगाठी!’
By admin | Published: February 13, 2016 03:38 AM2016-02-13T03:38:02+5:302016-02-13T03:38:02+5:30
‘मी इंजिनीअर आहे, इतके कमावतो, तू मला शिकवू नकोस’ किंवा ‘मी माझ्या माहेरी असं काही केलं नाही तर आता का करू’ अशा क्षुल्लक कारणांवरून सुरू होणारी भांडणे घटस्फोटापर्यंत पोहोचतात
मुंबई : ‘मी इंजिनीअर आहे, इतके कमावतो, तू मला शिकवू नकोस’ किंवा ‘मी माझ्या माहेरी असं काही केलं नाही तर आता का करू’ अशा क्षुल्लक कारणांवरून सुरू होणारी भांडणे घटस्फोटापर्यंत पोहोचतात आणि आयुष्यभराची साथ देण्याचे वचन देणारे एकमेकांपासून दुरावतात. या दुरावलेल्या जोडप्यांची मने जुळवण्याचे काम कौटुंबिक न्यायालयाने केले आहे. तब्बल १५ जोडप्यांच्या पुन्हा एकदा रेशीमगाठी बांधल्या आहेत.
बार असोसिएशन आणि कौटुंबिक न्यायालयाच्या वतीने व्हॅलेंटाइन्स डेच्या पूर्वसंध्येला ‘फिरुनी जुळल्या रेशीमगाठी’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कौटुंबिक न्यायालयात किरकोळ कारणांवरून घटस्फोटाची मागणी करत अनेक जोडपी येतात. या जोडप्यांमधील वादाला ‘तडजोड, अहंकार आणि पैसा’ या तीन गोष्टी कारणीभूत असतात. पण यावर कोणताही तोडगा न काढता थेट घटस्फोटाचे पाऊल उचलतात.
दुरावलेल्या याच जोडप्यांना केवळ समुपदेशनाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. समुपदेशक प्रतिभा जगताप यांनी समुपदेशनातून ही मने पुन्हा एकदा जुळवली आहेत. एकत्र आणण्यात आलेल्या या १५ जोडप्यांंचा छोटेखानी सत्कार कौटुंबिक न्यायालयाच्या वतीने करण्यात आला. या प्रसंगी सिनेसृष्टीतील ऐश्वर्या आणि अविनाश नारकर, सरिता आणि अभिनेता भरत जाधव, प्रिन्सिपल आय. जे. नंदा, वकील दिलीप तेली, विवाह समुपदेशक वीणा आठवले उपस्थित होते. (प्रतिनिधी)
किरकोळ कारणांवरुन होणाऱ्या घटस्फोटांचा परिणाम कुटुंबावर होतो. सामंजस्याने तंटे सोडवले, तर कोर्टाची पायरी चढण्याची वेळ येणार नाही. कौटुंबिक न्यायालय म्हणजे ‘घटस्फोटाचे ठिकाण’ ही ओळख मिटवून मने जुळवणारी संस्था अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
- मंजुषा माटे, प्रबंधक, कौटुंबिक न्यायालय