Join us

मुंबई पोर्ट ट्रस्टमधील कोविड आश्रम पुन्हा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टमधील कोविड आश्रम पुन्हा सुरू करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. पोर्ट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टमधील कोविड आश्रम पुन्हा सुरू करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. पोर्ट ट्रस्टच्या रुग्णालयावरील भार कमी करण्यासाठी गेल्या वर्षी या आश्रमाची निर्मिती करण्यात आली होती.

पोर्ट ट्रस्टच्या वडाळा येथील रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर दोन दिवसांनी रुग्णाला या आश्रमात दाखल केले जायचे. तेथे योग आणि ध्यानधारणेसाठी सभागृह, भव्य भोजनगृह आणि रुग्णांना फेरफटका मारण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याचप्रमाणे वाफ, गुळण्या आणि काढ्यासाठी विशेष व्यवस्था होती. त्यामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्य राखले जात होते.

आश्रमात डॉक्टर आणि परिचारिकांचे पथक, २४ तास रुग्णवाहिकेची उपलब्धता करून देण्यात आली होती. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षारक्षक आणि व्यवस्थापकांसाठी सुरक्षा मार्गिका बनविण्यात आली होती. त्याशिवाय रुग्ण आणि रुग्णालय यांच्यातील दुवा म्हणून वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याची नोडल आफिसर म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे पोर्ट ट्रस्टमधील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना हा कोविड आश्रम आधारवड ठरत होता.

मात्र, रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर काही महिन्यांपूर्वी आश्रम बंद करण्यात आला. आता पुन्हा कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे हा आश्रम पुन्हा सुरू करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

* निवृत्त कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका

मुंबई पोर्ट ट्रस्टचे निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही या रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा लाभ घेता येईल, अशी तरतूद शासनाने केली आहे. त्यामुळे कोविड काळात त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका.

लसीकरणात सुसूत्रता आणा, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन यांची कमतरता जाणवू नये यासाठी खबरदारी घ्या, अशी मागणी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉइज युनियनने केली आहे.

------------------------------------------------