Join us

ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा पंक्चर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 4:07 AM

मुंबई : मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसत आहे. संचारबंदीचा ट्रॅव्हल्स ...

मुंबई : मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसत आहे. संचारबंदीचा ट्रॅव्हल्स व्यवसायावरही परिणाम झाला आहे. डिझेलचा खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. त्यातच ड्रायव्हर, क्लिनरच्या वेतनाचा खर्चही घरातूनच करावा लागत आहे. हा व्यवसाय फार दिवस चालणार नसल्याच्या प्रतिक्रिया ट्रॅव्हल्स मालकांकडून व्यक्त होत आहेत.

मागील वर्षभरापासून कोरोनाने मुंबईत शिरकाव केला आहे. लॉकडाऊनमुळे तर सर्व व्यवसायच कोलमडून गेले आहेत. मध्यंतरी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने व्यवसाय स्थिरावतील, अशी अपेक्षा होती. मात्र, पुन्हा कोरोना हातपाय पसरत असून, याचा फटका सर्वांनाच बसत आहे. यातून ट्रॅव्हल्स व्यवसायही सुटलेला नाही. अगोदरच डिझेलच्या दरात वाढ त्यातच कोरोनामुळे प्रवासी ट्रॅव्हल्सकडे फिरकत नसल्याने फेऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. यातून डिझेलचा खर्चही निघत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे निम्म्या ट्रॅव्हल्स जागेवरच उभ्या आहेत. कोरोनामुळे व्यवसायाला फटका बसला असताना शासनाने कोणत्याही करात सूट दिलेली नाही. त्यामुळे मासिक हप्ते कसे भरावेत, असा प्रश्न उभा राहात आहे. अशीच स्थिती राहिली तर हा व्यवसाय जास्त दिवस चालणार नसल्याच्या प्रतिक्रिया ट्रॅव्हल्स मालकांकडून व्यक्त होत आहेत.

कोरोनाआधी रोज बाहेरगावी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या - ८००

सध्याची संख्या - ५००

गाडी रुळावर येत होती पण...

लॉकडाऊननंतर कोरोना रुग्णसंख्येत घट झाली होती. त्यामुळे शासनाने टप्प्याटप्प्याने विविध क्षेत्रांवरील बंदी उठवली होती. त्यामुळे ट्रॅव्हल्सच्या व्यवसायाने पुन्हा गती घेतली होती. मात्र, आता कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध घातले आहेत. त्यामुळे पुन्हा हा व्यवसाय कोलमडला आहे.

...........................

मुंबई महानगर क्षेत्रात ३७ हजार बसेस आहेत त्यापैकी ७००० शालेय बस आहेत. त्या ७००० बस एक वर्षांपासून उभा आहेत. तर उर्वरित ३०००० बसमध्ये केवळ १०००० बस व्यवसाय सुरू होता. तो आकडा आता ८००० वर आला आहे. एक बसला दररोज ७००० चा व्यवसाय मिळतो. २९ हजार बसला दररोज ७००० रुपयांचे नुकसान होत आहे.

हर्ष कोटक ,सचिव, बस मालक संघटना