ठाण्यातील महत्त्वाच्या ६ प्रकल्पांसाठी पुन्हा निविदा; एमएमआरडीएकडून आधीच्या निविदा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 06:44 AM2024-06-30T06:44:59+5:302024-06-30T06:45:11+5:30

आता या कामांसाठी कंत्राटदारांना १२ जुलैपर्यंत निविदा दाखल करता येणार आहेत. 

Re-tendering for 6 important projects in Thane Cancellation of previous tender by MMRDA | ठाण्यातील महत्त्वाच्या ६ प्रकल्पांसाठी पुन्हा निविदा; एमएमआरडीएकडून आधीच्या निविदा रद्द

ठाण्यातील महत्त्वाच्या ६ प्रकल्पांसाठी पुन्हा निविदा; एमएमआरडीएकडून आधीच्या निविदा रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यातील सहा पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी मागविलेल्या निविदा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) रद्द केल्या आहेत. आता एमएमआरडीएने या प्रकल्पांसाठी नव्याने निविदा मागविल्या असून तांत्रिक अडचणींमुळे आधीच्या निविदा रद्द कराव्या लागल्याचे एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी नमूद केले. 

एमएमआरडीएने लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाणे कोस्टल रोड, पूर्व मुक्त मार्गाचा छेडानगर ते ठाणे विस्तार, कासारवडवली ते खारबाव खाडीपूल, गायमुख ते पायेगाव खाडीपूल, राष्ट्रीय महामार्ग ४ ते कटाई नाका उन्नत रस्ता, त्याचबरोबर कल्याण मुरबाड रोड ते बदलापूर रोड ते पुणे लिंक रोड उन्नत रस्त्याचे काम हाती घेतले होते. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच, या निविदा खुल्या करण्याचे नियोजन त्यावेळी एमएमआरडीएने केले होते. या प्रकल्पांसाठी कंत्राटदारांची नियुक्ती करून विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचे भूमिपूजन करण्याचे नियोजन होते. मात्र, या निविदा रद्द कराव्या लागल्याने, आता या प्रकल्पांसाठी कंत्राटदार अंतिम करण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे. आता या कामांसाठी कंत्राटदारांना १२ जुलैपर्यंत निविदा दाखल करता येणार आहेत. 

एमएमआरडीएने निवडणुकीपूर्वी नऊ मोठ्या प्रकल्पांसाठी निविदा काढल्या होत्या. त्यातील तीन प्रकल्पांसाठी कंत्राटदारांनी निविदा दाखल केल्या आहेत. मात्र, अन्य सहा प्रकल्पांसाठी निविदा भरताना कंत्राटदारांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यातून कंत्राटदारांना निविदा भरता आली नव्हती. मात्र, ही तांत्रिक चूक दुरुस्त करणे शक्य नसल्याने कंत्राटदारांच्या मागणीनुसार नव्याने निविदा काढाव्या लागल्या, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दोष दायित्व कालावधी दोन वर्षांचा
एमएमआरडीएने लोकसभा निवडणुकीपूर्वी काढलेल्या निविदेत या प्रकल्पांच्या बांधकामाचा दोष दायित्व कालावधी पाच वर्षांचा होता. त्यावेळी जारी केलेल्या शुद्धिपत्रकात हा कालावधी दोन वर्षे करण्यात आला. आता नव्याने निविदा मागविल्यानंतरही हा दोष दायित्व कालावधी दोन वर्षे ठेवण्यात आला आहे. दोष दायित्व कालावधीत प्रकल्पाची काही हानी झाल्यास ते दुरुस्त करून देण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असते. हा कालावधी अधिक असल्यास त्या कालावधीच्या कामापोटी येणाऱ्या खर्चासाठी कंत्राटदारांकडून अधिक रकमेच्या निविदा दाखल केल्या जातात. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च कमी करण्यासाठी हा कालावधी कमी ठेवल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

प्रकल्प कोणते?
एनएच ४ ते कटाई नाका उन्नत मार्ग
 १,८८७ कोटी  
गायमुख ते पायेगाव खाडीपूल
 ९२९ कोटी  
ठाणे कोस्टल रोडचा बाळकुम ते गायमुख सागरी मार्ग
 २,५९७ कोटी  
पूर्व द्रुतगती मार्गाचा छेडानगर येथून ठाण्यापर्यंत विस्तार प्रकल्प
 २,५६० कोटी   
कासारवडवली ते खारबाव खाडीपूल
 १,४५३ कोटी

Web Title: Re-tendering for 6 important projects in Thane Cancellation of previous tender by MMRDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.