तीन दिवसांच्या ब्रेकनंतर आजपासून पुन्हा लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:05 AM2021-07-12T04:05:03+5:302021-07-12T04:05:03+5:30
संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पुरेशा लसींच्या साठ्याअभावी दि. ९ आणि १० ...
संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुरेशा लसींच्या साठ्याअभावी दि. ९ आणि १० जुलै रोजी मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. रविवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी लसीकरण कार्यक्रम नियमित सुट्टी म्हणून बंद ठेवण्यात आला होता. मात्र, आता लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्यानुसार पुन्हा सोमवारपासून लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेने संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे. विविध रुग्णालये व भव्य कोविड उपचार केंद्र (जम्बो सेंटर) तसेच कोरोना काळजी केंद्रे (सीसीसी) यातील रुग्णशय्या सुसज्ज करुन उपचारांसाठी उपलब्ध आहेत. त्यासमवेत लहान मुलांसाठीही स्वतंत्र असे कक्ष सर्व रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांसह जम्बो सेंटर्समध्ये असून, मुलांच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, यासाठी विशेष दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.
जम्बो कोविड सेंटर्समध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये अधिकाधिक नवीन रुग्णशय्या क्षमता विकसित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यात कांजूरमार्ग, मालाड, शीव, वरळी रेसकोर्स, भायखळा, गोरेगाव नेस्को, वरळी एनएससीआय यांचा समावेश आहे.
प्रत्येक जम्बो कोविड सेंटरमध्ये द्रवरुप वैद्यकीय प्राणवायू साठवण टाक्या उपलब्ध आहेत. प्राणवायू सिलिंडर्स बॅकअपसह विविध रुग्णालयांमध्ये वातावरणातील हवेतून वैद्यकीय प्राणवायू उत्पादीत करणारी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यामुळे प्राणवायूची अडचण नाही. कोविडबाधित गरोदर मातांसाठी स्वतंत्र कक्ष असून, दुसरी लाट ओसरली असली आणि लसीकरण वेगाने सुरु असले तरीही सर्व नागरिकांनी प्रतिबंधक नियमांचे योग्यरित्या पालन केले पाहिजे. लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबाची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.