Join us

मढवरून वर्सोवा गाठा ७ ते १० मिनिटांत; उड्डाणपुलाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 9:45 AM

७०० कोटींची तरतूद. 

मुंबई : मढ-वर्सोवा उड्डाणपुलाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्यता दिल्याने ७०० कोटी रुपये खर्चून पालिकेतर्फे हा पूल बांधण्यात येणार आहे. मढ बेट-वर्सोवादरम्यान २२ किमीचे अंतर स्वामी विवेकानंद मार्गाने कापण्यासाठी ४५ ते ९० मिनिटे इतका वेळ लागतो, मात्र हा पूल पूर्ण झाल्यानंतर अवघ्या सात ते १० मिनिटांत हे अंतर गाठता येणार आहे. 

मुंबईतील वाहतूककोंडीवर उपाय म्हणून उड्डाणपुलांचे जाळे वाढवले जात आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणात नवीन पुलांची उभारणी करण्यात येत आहे. मढ ते वर्सोवा थेट सार्वजनिक वाहतुकीचा एकमेव मार्ग म्हणजे फेरीसेवा आहे. मात्र ही सेवा वर्षातून चार महिने बंद असते. त्यामुळे मढ किंवा वर्सोवा येथे जाण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्ग किंवा स्वामी विवेकानंद मार्ग असे दोन अन्य वाहतुकीचे पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. 

काही वर्षांपासून नवीन पुलाची मागणी केली जात होती. हा पूल १.०५ कि.मी. लांब आणि २७.०५ मीटर रुंद असणार आहे. पालिकेला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयांकडून देण्यात आलेल्या मंजुरीमध्ये पी उत्तर विभागातील मार्वे रोडवरील धारीवली पूल, खाडीवरील वाहतुकीसाठीच्या पुलाचा समावेश आहे.

नोकरदार, विद्यार्थ्यांना दिलासा :

१. मालाड पश्चिमेकडील मढ परिसर आणि अंधेरीतील वर्सोवा हा भाग सागरी किनारपट्टीने वेढलेला आहे. त्यामुळे या भागांत प्रवासासाठी सागरी बोटीचा वापर होतो. 

२. ही जलवाहतूक अधिक जलद करण्यासाठी मढ ते वर्सोवा या जलवाहतूक पुलाचा पर्याय काढण्यात आला आहे. या नव्या पुलामुळे दोन्ही भागांतील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, मच्छीमार बांधव, व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध :

वाहतूक कोंडी फोडणाऱ्या मढ-वर्सोवा पुलाच्या प्रस्तावित बांधकामामुळे या परिसरातील नागरी सुविधांवरचा अतिरिक्त भार वाढणार असल्याची भीती सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. या प्रस्तावित पुलामुळे स्थानिकांची मासेमारीची कामे, मासेमारीची जाळी दुरुस्त करणे इत्यादी नष्ट होतील. त्यामुळे स्थानिकांचे रोजगार बुडतील. मार्वे-मनोरी फेरी सेवा आणि गोराई फेरी सेवेमध्येही याच कथेची पुनरावृत्ती होणार आहे, अशी भीती वॉचडॉग फाउंडेशचे विश्वस्त ॲड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी व्यक्त केली.

टॅग्स :मुंबईवर्सोवा