मरिन ड्राइव्हवरून वरळी गाठा अवघ्या दहा मिनिटांत!, कोस्टल रोडची दुसरी मार्गिका मंगळवारपासून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 08:10 AM2024-06-10T08:10:35+5:302024-06-10T08:11:01+5:30

Mumbai News: महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील मरिन ड्राइव्हपासून सुरू होणारा दुसरा भूमिगत बोगदा उत्तर दिशेकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याची पाहणी करणार आहेत.

Reach Worli from Marine Drive in Just 10 Minutes!, Coastal Road's second stretch from Tuesday | मरिन ड्राइव्हवरून वरळी गाठा अवघ्या दहा मिनिटांत!, कोस्टल रोडची दुसरी मार्गिका मंगळवारपासून सुरू

मरिन ड्राइव्हवरून वरळी गाठा अवघ्या दहा मिनिटांत!, कोस्टल रोडची दुसरी मार्गिका मंगळवारपासून सुरू

 मुंबई - महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील मरिन ड्राइव्हपासून सुरू होणारा दुसरा भूमिगत बोगदा उत्तर दिशेकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याची पाहणी करणार आहेत. त्यानंतर मंगळवारपासून सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत म्हणजे १६ तासांच्या कालावधीसाठी हा मार्ग वाहतुकीला खुला करण्यात येणार आहे. 

दर आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस या मार्गावर वाहतूक सुरू राहणार आहे, तर प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी हा मार्ग शनिवार आणि रविवार बंद राहणार आहे. 

अडीच महिन्यांपूर्वी म्हणजेच ११ मार्च २०२४ रोजी कोस्टल रोडची वरळी ते मरिन ड्राइव्ह ही दक्षिण मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईकरांना त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. मुंबईकरांचा प्रवास जलद आणि अधिक सुकर व्हावा, या उद्देशाने टप्प्या-टप्प्याने हा मार्ग खुला करण्यात येत आहे. आता दुसरी मार्गिका आठवड्यातले पाच दिवस खुली करण्यात येणार आहे. 

कुठला प्रवास सुकर होणार? 
मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर प्रामुख्याने मरिन ड्राइव्ह परिसर ते हाजी अली हा सुमारे ६.२५ किलोमीटरचा मार्ग खुला होत आहे. या मार्गामध्ये अमरसन्स उद्यान व हाजी अली येथील आंतरमार्गिकांचा वापर करता येणार आहे. या आंतरमार्गिकांमुळे वेगवेगळ्या भागांत होणारी वाहतूक अधिक सुलभ होईल. प्रामुख्याने बॅ. रजनी पटेल चौकातून पुढे वरळी, वांद्रेच्या दिशेने तर वत्सलाबाई देसाई चौकातून पुढे महालक्ष्मी, ताडदेव, पेडर रोडकडे जाणाऱ्या वाहनांची सोय होणार आहे. 

Web Title: Reach Worli from Marine Drive in Just 10 Minutes!, Coastal Road's second stretch from Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.