मुंबई : राज्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ दोन लाख कोटींचे प्रकल्प राबवीत आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निर्मितीत महाराष्ट्र राज्य देशात क्रमांक एकवर आहे. महामंडळांच्या माध्यमातून राज्यात पाच हजार किमी लांबीचे द्रुतगती मार्गाचे ग्रीड नेटवर्क उभारणार आहोत. त्यामुळे राज्याच्या कुठल्याही भागातून कुठेही सहा ते सात तासांत पोहोचता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथे व्यक्त केला.
सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक ३ च्या मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनी मार्गिकेचे उद्घाटन व रेवस (रायगड) ते रेडी (सिंधुदुर्ग) या सागरी महामार्गावरील धरमतर, कुंडलिका, आगरदांडा, बाणकोट, केळशी, जयगड आणि कुणकेश्वर या सात खाडी पुलांच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते कोकण हे अंतर अवघ्या पाच तासांत पार करता येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे, माजी खा. राहुल शेवाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. अनिलकुमार गायकवाड उपस्थित होते.
...ती मागणी आज पूर्ण - मुख्यमंत्री म्हणाले, रेवस ते रेडी सागरी महामार्गावरील सात खाडी पुलांची मागणी राज्याच्या स्थापनेपासून होती. ती मागणी आज पूर्ण होतेय.- या खाडी पुलांमुळे कोकणाचा विकास होईल. पनवेल ते सिंधुदुर्गदरम्यानच्या कोकण ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वेचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. - या सात खाडी पुलांची एकूण लांबी २६.७० किलोमीटर असून त्यासाठी ७ हजार ८५१ कोटी रुपयांची मान्यता आहे
८०% पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दक्षिण वाहिनीचे काम पूर्ण झाले आहे.सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक ३प्रत्येकी ३ मार्गिकांचे २ पूल बांधले जातील.प्रकल्पाची एकूण किंमत ५५९ कोटी रुपये आहे.पुलाची लांबी ३१८० मीटर सद्य:स्थितीत उत्तर वाहिनी पुलाचे काम पूर्ण करत आजपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे.