बोहल्यावर चढण्यापूर्वीच आजी पोहोचल्या पोलीस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:16 AM2018-04-01T01:16:59+5:302018-04-01T01:16:59+5:30
वयाच्या साठाव्या वर्षीही लग्न करण्याची इच्छा असणाऱ्या एका आजीबार्इंना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना वरळीतील उच्चभ्रू वसाहतीमध्ये घडली आहे. वयाच्या साठाव्या वर्षीही त्यांचा जोडीदाराचा शोध सुरू होता.
मुंबई : वयाच्या साठाव्या वर्षीही लग्न करण्याची इच्छा असणाऱ्या एका आजीबार्इंना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना वरळीतील उच्चभ्रू वसाहतीमध्ये घडली आहे. वयाच्या साठाव्या वर्षीही त्यांचा जोडीदाराचा शोध सुरू होता. तेव्हा एका व्यवस्थापक पदावर कार्यरत असणाºया व्यक्तीचे स्थळ आले. पहिल्या भेटीतच त्यांनी त्याला पसंत केले. कुटुंबाच्या भेटीगाठी झाल्यानंतर लग्नाची तारीखही ठरली होती. पण लग्नाच्या आधी त्या व्यक्तीने महिलेला आई आजारी असल्यासहित विविध कारणे देत साडे नऊ लाख रुपये उकळले. तर लग्नाच्या दिवशीच तो नॉट रिचेबल झाल्याने बोहल्यावर चढण्याऐवजी आजींना पोलीस
स्टेशन गाठावे लागल्याचा
प्रकार शुक्रवारी वरळीत उघडकीस आला.
वरळीच्या उच्चभ्रू वसाहतीत ६० वर्षीय शांता (नाव बदललेले आहे) या त्यांची आई व बहिणीसोबत राहतात. शांता यांची बहीण पालिकेत नोकरीला आहे. शांता अविवाहित आहेत. वयाच्या साठाव्या वर्षीही त्यांचा वराचा शोध सुरू होता. त्यांनी १९ एप्रिल २०१५ रोजी दैनिकात लग्नासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. तेच पाहून ८ दिवसांनी मधुकर सीताराम आपटे या नावाने त्यांना फोन आला. तेव्हा आपटेने तो ज्युपिटर केमिकल्स येथे व्यवस्थापक असल्याचे सांगितले. घटस्फोटीत असल्याने मुलुंडच्या घरी तो एकटाच राहतो आणि मुलगा थायलंडला असल्याची माहिती त्याने दिली.
आपटेच्या सांगण्यावरून वरळीत त्यांची भेट झाली. पहिल्या भेटीतच आपटे हा शांता यांच्या मनात बसला. सुरुवातीला आपटे घरच्यांना भेटण्यास आला नाही, म्हणून त्यांनी त्याला होकार दिला नाही. मात्र यादरम्यान दोघांचे फोनवरून संभाषण सुरू होते. शांता यांच्या सांगण्यावरून मे २०१५मध्ये आपटेने त्यांच्या घरच्यांची भेट घेतली. आई व बहिणीस तो लग्नाकरिता योग्य वाटल्याने घरातील लोकांच्या सहमतीने त्यांनी लग्नासाठी होकार दिला.
सुरुवातीला आपटेने मुलगा थायलंडमधून मुंबईत येणार आहे. तो आधी स्वत: लग्न करणार असून त्यानंतर आपले लग्न लावून देणार असल्याचे सांगितले.
शांता यांना ते पटले. त्यानंतर सप्टेंबर २०१५पासून आई आजारी असल्याचे कारण पुढे करून आपटेने त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. शांताही त्यांना मदतीच्या नावाखाली पैसे पुरवत असल्याने आपटेच्या मागण्या वाढत गेल्या. अखेर गेल्या वर्षी आईचे निधन झाल्याचे सांगून रत्नागिरीत जमीन खरेदीस पैसे काढले. यामध्ये त्यांनी जवळपास
साडे नऊ लाख रुपये आपटेला
दिले. पण आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी शुक्रवारी वरळी पोलीस ठाणे गाठून तक्रार
दिली.
असा झाला भंडाफोड
या व्यवहारांची तपासणी करत असताना, आपटेला आरटीजीएसद्वारे दिलेल्या रकमेच्या माहितीत अरुण टी. गुरव नाव असल्याचे निदर्शनास आले. याबाबत आपटेकडे विचारणा करताच, मुलास कळू नये म्हणून मित्राच्या बँक खात्याचा वापर केल्याचे सांगितले. तो मित्र विलेपार्ले येथील अरुण चाळीत राहतो असे सांगितले होते. काही दिवसांनी मार्चमध्ये शांता यांच्या लग्नाची लगबग सुरू झाली. मात्र लग्नाच्या दिवशीच आपटे नॉट रिचेबल झाला. बहिणीने विलेपार्ले येथील मित्राचा शोध घेतला, तेव्हा ते आपटेला ओळखत नसल्याची माहिती समोर आली.