‘महाराष्ट्र बंद’चे चेंबूर व घाटकोपरमध्ये पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 03:27 AM2020-01-25T03:27:42+5:302020-01-25T03:28:23+5:30
सीएए आणि एनआरसीविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात बंदची हाक देण्यात आली होती. मुंबईच्या पूर्व उपनगरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
मुंबई : सीएए आणि एनआरसीविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात बंदची हाक देण्यात आली होती. मुंबईच्या पूर्व उपनगरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. चेंबूर व घाटकोपरमध्ये या बंदचे सकाळपासून पडसाद उमटले. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चेंबूरच्या लालडोंगर, सिद्धार्थ कॉलनी, पी़ एल़ लोखंडे मार्ग, चेंबूर कॅम्प, पांजारापोळ व सुभाष नगर तसेच घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीमधील दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. या परिसरामधील सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून बेस्ट प्रशासनातर्फे चेंबूर, घाटकोपर, विक्रोळी, पवई व भांडुप या ठिकाणी जाणाºया बेस्ट बसना जाळ्या लावण्यात आल्या होत्या. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठिकठिकाणी महाराष्ट्र बंदचे आवाहन करणारे फलक व बॅनर लावण्यात आले होते.
सकाळी नऊच्या सुमारास सायन-पनवेल मार्गावरील प्रियदर्शनी उड्डाणपुलाजवळ काही आंदोलकांनी रास्तारोको केला होता. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर तत्काळ हा रास्तारोको मागे घेण्यात आला. साडेअकराच्या सुमारास लालडोंगर परिसरातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चाचे आयोजन केले होते. लालडोंगर परिसरातून निघालेला मोर्चा सुमन नगर येथून छगन मिठा पेट्रोल पंप येथे पोहोचला. या वेळी आंदोलकांनी काही काळासाठी रास्तारोको केला. पोलिसांनी मध्यस्ती केल्यामुळे कार्यकर्ते रस्त्यावरून बाजूला झाले व मोर्चा पुन्हा लाल डोंगरमध्ये वळविण्यात आला. पांजरापोळ परिसरातदेखील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. या वेळी रस्त्याच्या बाजूस उभे राहून कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली तसेच हातात फलक घेऊन निदर्शने केली.
बेस्टच्या तीन बसगाड्यांची तोडफोड
महाराष्ट्र बंदमध्ये झालेल्या दगडफेकीत तीन बसगाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने या घटनांमध्ये प्रवाशाना कोणतीही इजा झालेली नाही. बेस्टची बसगाडी क्रमांक ३६२ ही चेंबूर, स्वस्तिक पार्क येथून सकाळी ९.१५ वाजता जात असताना बसच्या पुढील काचेवर दगड मारण्यात आला. त्यामुळे बसची चालकासमोरील मोठी काच फुटली. बस क्रमांक ४३० ही बसगाडी शांतीबाग, चेंबूर येथून सकाळी ९.५० वाजताच्या सुमारास जात असताना या बसवरही अज्ञाताने दगडफेक केली. तर बस क्रमांक ३७ ही बस मलबार हिल येथून दुपारी १.०५ वाजताच्या सुमारास जात असताना या बसगाडीवरही दगडफेक करण्यात आली. सुदैवाने या घटनेत प्रवासी जखमी झाले नाहीत.
चेंबूरमध्ये बसवर दगडफेक
सकाळी सव्वानऊच्या सुमारास कुर्ला पूर्व बस डेपो येथून चेंबूर रेल्वे स्थानकाकडे निघालेल्या बस क्रमांक ३६२ वर स्वस्तिक पार्क येथे अज्ञात इसमांकडून दगडफेक करण्यात आली. बसमधील वाहकाच्या म्हणण्यानुसार, चालती बस थांबवून प्रवाशांना खाली उतरवून ही दगडफेक करण्यात आली. तोंडावर रूमाल बांधून आलेल्या इसमांनी बसच्या समोरील काच फोडली. यात बसचालक विलास बाबासाहेब दाभाडे (५३) यांच्या दोन्ही हातांना काचा लागून ते जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता शताब्दी रुग्णालयात नेण्यात
आले.