- रघुनाथ मयेकर, काळा चौकी
गेल्यावर्षीच्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यावसायिक अडचणीत आले. आर्थिक गणित बिघडल्याने व्यवसाय बंद करण्याची वेळ आली. त्या काळात माझेही छोटेखानी खानावळीचा व्यवसाय बंद असल्याने तीन महिन्यांचे भाडे खिशांतून भरावे लागले. या परिस्थितीतून व्यावसायिक अद्यापही सावरलेले नाहीत. अशातच पुन्हा लॉकडाऊन झाल्यास व्यावसायिकांसह सामान्य नागरिकांनाही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे आता राज्य शासनाने लावलेले निर्बंध अत्यंत पारदर्शी आहेत या प्रक्रियेत लहान व्यावसायिक, मजुरांचा विचार केल्याने दिलासा मिळाला आहे.
बेफिकीरीवर कडक निर्बंध महत्त्वाचे
- अंजली शिवलकर, गिरगाव
लॉकडाऊननंतर झालेल्या शिथीलतेमुळे सामान्य नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्य शासनाने कडक निर्बंधाचे उचललेले पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे. याची कडक अंमलबजावणी करायला हवी, शिवाय वेळ आल्यास दंडात्मक शुल्कही वाढवावे. मात्र, या सगळ्यात सामान्यांची आर्थिक घडी विस्कटणार नाही याची यंत्रणांनी खबरदारी बाळगली पाहिजे.
अंमलबजावणी कठोर हवी
- हर्षित कटारिया, डोंगरी
राज्य शासनाच्या निर्बंधाचे स्वागत आहे, मात्र, त्याच्या कठोर अंमलबजावणीकडे यंत्रणांनी लक्ष दिले पाहिजे. बऱ्याचदा आपल्याकडे मनुष्यबळाचा तुटवडा दिसून येतो, त्यामुळे नियम आखूनही ते सर्व कागदावरच असतात. अशा स्थितीत कोरोनाची गंभीर परिस्थिती ओळखून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अंमलबजावणीवर भर द्यायला हवा
नियम सकारात्मक, मात्र आरोग्य यंत्रणाही सक्षम करा
- सुषमा जैन
संपूर्ण लॉकडाऊन न करता शासनाने कठोर निर्बंध घातले याचे स्वागत आहेच. भाजी मंडईपासून ते लोकलपर्यंत या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. मात्र, दुसरीकडे शहर उपनगरातील आरोग्य यंत्रणा सक्षम कऱण्यावर अधिकाधिक भर दिला पाहिजे. जेणेकरून केवळ सर्वसामान्यांचा वावर रोखून संसर्ग न थांबविता त्याविरोधात लढण्यासाठी आपल्याकडे सक्षम आरोग्याच्या पायाभूत सेवा–सुविधा, मनुष्यबळ असेल.
निर्बंध सकारात्मक
- कृतिका पाटील, परळ
सामान्यांच्या संसाराची आर्थिक घडी न विस्कटता निर्बंध घातल्याने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे किमान रोजगार कायम राहील आणि घरात अन्न शिजेल याची खात्री आहे. मागच्या वर्षी लॉकडाऊनमुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली होती, त्यामुळे आता याचा विचारही नकोसा वाटतो. त्यामुळे जबाबदार नागरिक म्हणून कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मास्कचा वापर, स्वच्छता आणि शारीरिक अंतर राखणे हे नियम प्रत्येकाने पाळले पाहिजेत.