मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवणार रिॲक्टिव्ह अस्फाल्ट; 2 तासांत रस्ता सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 01:02 PM2023-07-17T13:02:23+5:302023-07-17T13:02:48+5:30

कामात वेळ न गेल्याने दोन तासात होणार रस्ता वाहतूक सुरळीत

Reactive asphalt will fill potholes on the roads of Mumbai | मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवणार रिॲक्टिव्ह अस्फाल्ट; 2 तासांत रस्ता सुरू

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवणार रिॲक्टिव्ह अस्फाल्ट; 2 तासांत रस्ता सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे हे नित्याचेच झाले आहेत. या खड्ड्यातून जाताना मुंबईकरांना तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्यांवर निर्माण होणारे खड्डे जलदगतीने भरता यावेत म्हणून पालिकेच्या रस्ते विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. खड्डे भरण्यासाठी यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच रिॲक्टिव्ह अस्फाल्ट तंत्रज्ञानाचा पालिका वापर करणार आहे. या कामासाठी पालिका क्षेत्रात विभागनिहाय कामासाठीची जबाबदारी निश्चित करून खड्डे बुजवण्यासाठी  तरतूद केली आहे. 

खास करून खड्ड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी तातडीने खड्डे बुजवण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिल्या आहेत. त्यानुसार मुंबईतील काही ठिकाणी रिॲक्टिव्ह अस्फाल्टचा वापर करून खड्डे बुजविण्यात आले व तत्काळ रस्ते वाहतूक पूर्ववत करण्यात आली. 

दोन तासांत वाहतूक शक्य
रिॲक्टिव्ह अस्फाल्ट हे रसायनमिश्रीत डांबर आहे. महत्त्वाचे म्हणजे एरवी पाण्याच्या संपर्कात आल्याने डांबरी रस्त्यावर खड्डे तयार होतात, मात्र रिॲक्टिव्ह अस्फाल्टच्या मिश्रणावर पाणी टाकूनच खड्डा भरण्यात येतो. रासायनिक पावडर, खडी आणि पाणी या मिश्रणाचा वापर खड्डे बुजवण्यासाठी करण्यात येतो. रिॲक्टिव्ह अस्फाल्टमधील रासायनिक पावडरवर पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. अवघ्या दोन तासांमध्ये वाहतूक सुरू करता येते, असे मिश्रणाचे वैशिष्ट्य आहे.

२४ विभागांना मिश्रणाच्या पिशव्या
 मुंबईतील सर्व २४ विभागांना मिश्रणाच्या पिशव्या पुरविण्यात आल्या आहेत. इकोग्रीन इन्फ्रा डेव्हलपमेंट या कंपनीकडून हे तंत्रज्ञान विभागांना पुरवण्यात आले आहे. त्यातील रासायनिक पावडरची आयात करण्यात आली आहे.  

खड्ड्यांची पुन्हा तक्रार नाही
मुंबईतील पथदर्शी प्रकल्प अंतर्गत शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे याठिकाणी काही रस्त्यांवर खड्डे बुजवण्यासाठी या मिश्रणाचा वापर करण्यात आला. त्यानंतर या रस्त्यांवर वाहतूकही सुरळीतपणे सुरू करण्यात आली. रस्त्यावरची खडी निघणे किंवा पुन्हा खड्डा पडणे यासारखी कोणतीही तक्रार निदर्शनास आली नाही. 

रॅपिड हार्डनिंग कॉंक्रीटचाही होणार वापर
गतवर्षीच्या पावसाळ्यात पालिकेकडून रॅपिड हार्डनिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. तंत्रज्ञानाच्या वापरासाठी नऊ सेवा पुरवठादारांच्या माध्यमातून मुंबईत रॅपिड हार्डनिंगचा वापर करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी कोरड्या पृष्ठभागाची गरज असते. रॅपिड हार्डनिंग कॉंक्रीटचा वापर केल्यानंतर त्या रस्त्यावरून सहा तासांनी वाहतूक सुरू करणे शक्य होते

 

Web Title: Reactive asphalt will fill potholes on the roads of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.