फोटो मेल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरच्या अपघातांमध्ये वाढ झाल्यामुळे जीवितहानी, वित्तहानी होते. हे टाळण्यासाठी रासायनिक कारखान्यातील सुरक्षा अधिकारी, पर्यवेक्षक व उत्पादन व्यवस्थापक यांना प्रशिक्षण देण्यात आले.
डॉ. महेंद्र कल्याणकर, कामगार आयुक्त व संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली परळ येथील नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था येथे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कामगार विभाग यांच्यामार्फत या ॲक्टसेफ-२०२१ रिॲक्टर सुरक्षितता या दाेन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. या वेळी कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश बच्चू कडू, विनिता वेद सिंगल, प्रधान सचिव, डॉ. महेंद्र कल्याणकर उपस्थित होते.
सुरक्षा अधिकारी, पर्यवेक्षक व प्रॉडक्शन मॅनेजर यांनी कारखान्यात जाऊन इतर कामगारांना रिॲक्टर सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण दिल्यास अपघात टाळण्यासाठी मदत होईल. शून्य अपघात उद्दिष्ट साध्य होईल, असे डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या वेळी सांगितले.
दरम्यान, अपघात टाळण्यासाठी ऑपरेटर्स/ सुपरवायझर्स यांच्यासाठीही विविध महत्त्वाच्या विषयांवर महाराष्ट्रातील एकूण १८ विभागांत ३ दिवसीय कार्यशाळांचे आयोजन उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, रायगड विक्रम काटमवार यांनी केले होते. या कार्यशाळांमध्ये सहभागी झालेल्या एकूण ९८६ ऑपरेटर्स/सुपरवायझर्स यांना प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र देण्यात आले.
----------------------