मुंबई :
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने शासनातर्फे मुंबईतील शाळांमध्ये 'रीड मुंबई' हा उपक्रम राबविला जाणार आहे. शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असली पाहिजे, यासाठी शाळांच्या गच्चीवर 'किचन गार्डन' तयार करावीत. मध्यान्ह भोजनासाठी लागणारा भाजीपाला येथेच तयार करावा, अशी अपेक्षा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली.
कुर्ल्यातील मुंबई स्कूलमधील विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेच्या कुर्ला नेहरूनगर येथील मुंबई पब्लिक स्कूलच्या नवीन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजू तडवी आदी उपस्थित होते. मुंबई पब्लिक स्कूलमध्ये सध्या दहावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत; परंतु, या भागातील गरजू नागरिकांच्या पाल्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी बारावीपर्यंतचे वर्गही सुरू करावेत, अशी मागणी आमदार मंगेश कुडाळकर यांनी केली.