दुर्मीळ मराठी पुस्तके वाचा ‘मराठी रीडर’वर!

By admin | Published: January 31, 2017 02:56 AM2017-01-31T02:56:11+5:302017-01-31T02:56:11+5:30

मराठीतील दुर्मीळ आणि नवीन पुस्तके आता ई-पुस्तकांच्या रूपात वाचकांना उपलब्ध होणार आहेत. राज्यातील सहा प्रमुख प्रकाशकांनी एकत्र येत ‘मराठी रीडर’ या अ‍ॅपची निर्मिती केली

Read the rare Marathi books on 'Marathi Reader'! | दुर्मीळ मराठी पुस्तके वाचा ‘मराठी रीडर’वर!

दुर्मीळ मराठी पुस्तके वाचा ‘मराठी रीडर’वर!

Next

मुंबई : मराठीतील दुर्मीळ आणि नवीन पुस्तके आता ई-पुस्तकांच्या रूपात वाचकांना उपलब्ध होणार आहेत. राज्यातील सहा प्रमुख प्रकाशकांनी एकत्र येत ‘मराठी रीडर’ या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. या अ‍ॅपमार्फत संबंधित प्रकाशकांची दुर्मीळ आणि नवीन पुस्तके वाचण्याची मेजवानी वाचकांना मिळणार आहे. डोंबिवली येथील मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात येईल.
दुर्मीळ पुस्तके दुकानांत उपलब्ध नसल्याची खंत अनेकदा वाचकांमधून केली जात होती. याशिवाय डिजिटल जगात टिकून राहण्यासाठी ई-बुकचा पर्याय प्रामुख्याने समोर होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून प्रचंड मेहनत घेतल्यानंतर हे अ‍ॅप तयार केल्याचे रोहन चंपानेरकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, वाचकांना अ‍ॅण्ड्रॉईड मोबाइलमधील प्ले-स्टोअरमधून हे अ‍ॅप मोफत डाऊनलोड करता येईल. त्यानंतर वाचकांना नाव नोंदणी करून हवे ते पुस्तक डाऊनलोड करण्याची व्यवस्था केलेली आहे. सद्य:स्थितीत १००हून अधिक पुस्तके या ठिकाणी उपलब्ध आहेत. मात्र येत्या सहा महिन्यांत विविध प्रकाशकांना या अ‍ॅपच्या माध्यमातून जोडून घेऊन सुमारे अडीच हजारे पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल.
या अ‍ॅपचे वैशिष्ट्य म्हणजे पुस्तके डाऊनलोड केल्यानंतर त्यांतील अक्षरे वाचण्यासाठी अक्षरांचा आकार कमी-जास्त करण्याची व्यवस्था आहे. या व्यवस्थेमध्ये अक्षरांच्या आकाराप्रमाणे पानांची संख्या कमी-जास्त होते. त्यामुळे वाचकांना सलग वाचताना कोणतीही अडचण येत नाही.
पुस्तक वाचताना वाचकांचा रसभंग होऊ नये, म्हणून कोणत्याही प्रकारची जाहिरात या अ‍ॅपमध्ये घेतली नसल्याचे मिलिंद परांजपे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, पुस्तक वाचताना महत्त्वाची वाक्ये किंवा संदर्भ जतन करता येतील. शिवाय महत्त्वाचे संदर्भ प्रकाशमय किंवा वेगळ्या रंगाने गडद करण्याचा पर्याय अ‍ॅपमध्ये आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Read the rare Marathi books on 'Marathi Reader'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.