नद्या वाचल्या, तर मुंबई वाचेल!

By Admin | Published: March 7, 2016 02:48 AM2016-03-07T02:48:14+5:302016-03-07T02:48:14+5:30

‘मुंबई शहर आणि उपनगरात मिठी, ओशिवरा, दहिसर, पोईसर या चार नद्या असल्याची माहिती मुंबईकरांना होती. परंतु त्यांच्या संवर्धन, संरक्षणासाठी काहीच उपाययोजना केल्या जात नव्हत्या.

Read the rivers, Mumbai will be saved! | नद्या वाचल्या, तर मुंबई वाचेल!

नद्या वाचल्या, तर मुंबई वाचेल!

googlenewsNext

मुंबई : ‘मुंबई शहर आणि उपनगरात मिठी, ओशिवरा, दहिसर, पोईसर या चार नद्या असल्याची माहिती मुंबईकरांना होती. परंतु त्यांच्या संवर्धन, संरक्षणासाठी काहीच उपाययोजना केल्या जात नव्हत्या. रविवारी झालेल्या ‘रिव्हर मार्च’मध्ये सहभागी होत मुंबईकरांनी पर्यावरणाविषयीची तळमळ व्यक्त केली. लोकांच्या मदतीला मुंबई महापालिका आणि राज्य सरकार धावून आले तर इथल्या नद्या वाचतील आणि पर्यायाने मुंबईही वाचेल,’ असे प्रतिपादन जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांनी येथे केले.
नद्यांच्या संरक्षण-संवर्धनासाठी रविवारी सकाळी साडेसहा वाजता विविध ठिकाणी ‘रिव्हर मार्च’चे आयोजन करण्यात आले होते. दहिसर येथील कार्यक्रमात सिंह बोलत होते.
या वेळी महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचे संचालक अविनाश कुबल आणि रिम्पल संचला उपस्थित होते.
राजेंद्र सिंह म्हणाले की, ‘मुंबईत चार नद्या आहेत. याची जाणीव मुंबईकरांना आहे. परंतु त्यांच्या संवर्धनासाठी मुंबईकर सजग नाहीत. आज झालेल्या कार्यक्रमांमुळे मुंबईकरांनी नद्यांच्या संवर्धनासाठी उत्तम काम करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे; ही बाब कौतुकास्पद आहे. महत्त्वाचे म्हणजे नदी ही मनुष्याच्या आयुष्याचा एक भाग असते. मुंबईकरांचा हा प्रयोग यशस्वी झाला तर देशभरातील नागरिक याचा कित्ता गिरवतील, असा विश्वास आहे.’
‘नद्यांच्या संवर्धनासाठी मुंबईकरांनी कायम महापालिका आणि राज्य सरकारवर अवलंबून राहण्याची गरज नाही. परंतु तरीही महापालिका आणि राज्य सरकार एकत्र आले पाहिजे. नद्यांच्या संरक्षणासाठी समिती स्थापन केली पाहिजे. धोरण आखले पाहिजे. असे केले तरच मुंबईतील नद्या जिवंत राहतील. पर्यायाने मुंबई आणखी स्वच्छ आणि सुंदर होईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Read the rivers, Mumbai will be saved!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.