वाचा, पटलं तर इतरांना सांगा आणि शांत बसा..!
By अतुल कुलकर्णी | Published: November 14, 2022 01:05 PM2022-11-14T13:05:12+5:302022-11-14T13:06:03+5:30
गुलाम अली, लक्ष्मण देशपांडे यांच्या बाबतीत जे घडले, तेच आपल्या देशात आपल्याला घडवायचे आहे का..?
- अतुल कुलकर्णी
(संपादक, मुंबई)
प्रसंग पहिला : सार्क परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तानला जाण्याची संधी मिळाली. तिथे जगभरातून आलेल्या पत्रकारांसाठी गुलाम अली यांच्या गझल गायनाची मैफल होती. पहिल्या रांगेत तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यापासून पाकिस्तान सरकारचे अनेक मंत्री बसले होते. कार्यक्रम संपला. गुलाम अली स्टेजवरून खाली आले. पहिल्या रांगेतल्या, पहिल्या माणसापासून शेवटच्या माणसापर्यंत सगळ्यांना भेटले. सगळ्यांना त्यांनी हात जोडून नमस्कार केला. प्रत्येकाने त्यांचे कौतुक केले आणि गुलाम अली स्टेजवर निघून गेले. दुसऱ्या दिवशी मी त्यांना विचारले, भारतात, महाराष्ट्रात कितीही मोठी व्यक्ती असली तरी ती कलावंताला भेटायला स्टेजवर जाते. विंगेत जाऊन त्यांचे कौतुक करते. इथे तुम्ही खाली का आलात..? ते फक्त हसले आणि म्हणाले ये इंडिया नही है...
प्रसंग दुसरा : वऱ्हाड निघालं लंडनला या नाटकाने जग फिरून आलेले डॉ. लक्ष्मण देशपांडे सपत्नीक जर्मनीतल्या फ्रॅंकफर्ट विमानतळावर होते. त्यांना त्यांचे बोर्डिंग आणि तिकीट सापडत नव्हते. त्यांनी काउंटरवरच्या अधिकाऱ्याला अडचण सांगितली. त्या अधिकाऱ्याने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितले. तिसऱ्याने त्यांचा पासपोर्ट पाहिला. दोघांच्याही पासपोर्टवर टीचर असे लिहिले होते. ते पाहताच तो अधिकारी अन्य दोन अधिकाऱ्यांना बोलावून हे टीचर आहेत, यांच्यावर तू अविश्वास दाखवू नकोस, हे खोटं बोलू शकत नाहीत, असे सांगितले. असे म्हणत त्याने सौ. देशपांडे यांची क्षमा मागितली. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर आपण टीचर आहोत या अभिमानात हे दोघे पती- पत्नी होते. कस्टमच्या अधिकाऱ्याने त्यांना काही प्रश्न केले. त्यातल्या एका अधिकाऱ्याने, तुम क्या करते हो? असे विचारले. त्यांनी अभिमानाने ‘टीचर’ असे सांगताच तो अधिकारी दुसऱ्याला म्हणाला, अरे टीचर के पास क्या होगा... जाने दो...
हे दोन प्रसंग आठवण्याचे कारण ठरले प्रशांत दामले यांच्या १२,५०० व्या प्रयोगाच्या वेळी राज ठाकरे यांनी केलेले भाषण. आपल्याकडे कलावंतांना कशी वागणूक मिळते आणि अन्य देशात कलावंतांना किती जपले जाते, हे त्यांनी सोदाहरण सांगितले. रोम एअरपोर्टला लिओनार्दो विंची या जगविख्यात कलावंताचे नाव देण्यात आले आहे. आपल्याकडे मात्र कलावंतांची नावे नाट्यगृहाशिवाय एखाद्या रस्त्याला किंवा चौकाला असतात. मोहम्मद रफी चौक, शंकर जय किशन मार्ग अशी छोटी पाटी कुठेतरी दिसते. यापलीकडे आपले कलावंतांशी काही घेणे- देणे नसते. नुकतीच एक बातमी पुढे आली. ग्रीक देशात क्रेट बेटावर एक ॲम्फी थिएटरचे अवशेष संशोधनातून समोर आले. क्रेटच्या नैऋत्य दिशेला लिस्सोस नावाचे शहर होते. त्या शहरातील संस्कृतिक खुणा इसवी सन पूर्व चौथ्या शतकातल्या आहेत. त्या काळी तिथे अशा प्रकारचे थिएटर होते. याचा अर्थ त्याकाळी तिथे काही ना काही कार्यक्रम होत असावेत.
आता आपण आपल्या राज्यात येऊ. आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यात एक उत्कृष्ट नाट्यगृह असावे, अशी सरकारने घोषणा केली. त्यासाठी आर्थिक तरतूद केली. मात्र, ही घोषणा फक्त कागदावर राहिली. आपली नाट्यगृहे अत्यंत गचाळ अवस्थेत आहेत. कलावंतांना बसायला चांगल्या सोयी नाहीत. प्रेक्षकांसाठी कसल्या सुविधा नाहीत. अनेक जिल्ह्यांत तर नाट्यगृहांचा पत्ताच नाही. कुठल्याही राज्याची संस्कृती आणि सामाजिक भान जपण्याचे काम नाट्य, साहित्य, कला क्षेत्रातली मंडळी करत असतात. मात्र, आपल्याकडे हेच लोक आणि यासाठीची साधने पूर्णपणे दुर्लक्षित आहेत. ज्या देशांनी वेश्या व्यवसायाला कायद्याने नियंत्रित केले, त्या देशांमध्ये बलात्कारांचे प्रमाण कमी असल्याचे आकडेवारी सांगते. ज्या देशांनी कलेवर, साहित्यावर प्रेम केले, त्यांच्या देशातल्या शिक्षकांना मानसन्मान दिला ते देश सुसंस्कृत देश म्हणून उभे राहिले. आपल्याकडे शिक्षकांना कंत्राटी करून टाकले. पडेल त्या कामांसाठी त्यांना जुंपण्याचे काम सरकार करते. महाराष्ट्र नाट्यवेडा आहे. इथे कलावंतांवर प्रेम करणारे लोक आहेत. मात्र, त्यांच्या प्रसिद्धीचा उपयोग स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी करून घेणारे राजकीय नेतेच आपल्याकडे तुलनेने जास्त आहेत. या गोष्टी ज्या दिवशी थांबतील, त्या दिवशी या राज्यात सामाजिक आणि राजकीय कटुता कमी करण्यासाठी कसले वेगळे प्रयत्न करायची गरज उरणार नाही. तोपर्यंत तरी, हे वाचा, पटलं तर इतरांना सांगा, आणि शांत बसा..!