मूकबधिरांच्या गुन्ह्याला अशी फुटली वाचा...; पोलिसाच्या मुलाने केली मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 10:42 AM2024-08-09T10:42:33+5:302024-08-09T10:44:01+5:30
भोईवाडा पोलिस वसाहतीत राहणारे राजेश सातपुते हे आरएके मार्ग पोलिस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा दादरच्या साधना शाळेत शिकला.
मुंबई : सुटकेसमध्ये भरलेला मृतदेह हाती लागल्यानंतर मूकबधिर आरोपी जय चावडाची मूक संवादभाषा समजून घेण्यासाठी दादर रेल्वे पोलिसांनी मध्यरात्री मूकबधिरांची भाषा समजून घेणाऱ्यांचा शोध सुरू केला. नाकाबंदीला गाडी थांबताच पोलिसांनी तेथील हवालदाराकडे मूकबधिरांच्या शाळेबाबत चौकशी केली. मात्र, शाळेत रात्री कोणी भेटणार नसल्याचे सांगून हवालदार राजेश सातपुते यांनी रात्री दोन वाजता स्वतःच्या मूकबधिर मुलासह रेल्वे पोलिस ठाणे गाठले. त्यांचा मुलगा गौरव सातपुते याच्यामुळेच या प्रकरणाचा उलगडा झाला.
भोईवाडा पोलिस वसाहतीत राहणारे राजेश सातपुते हे आरएके मार्ग पोलिस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा दादरच्या साधना शाळेत शिकला.
दोघांनाही सांकेतिक भाषा अवगत आहे. सातपुते रविवारी सकाळी ते २४ तासांच्या कर्तव्यासाठी कार्यरत होते. रविवारी रात्री दोनच्या सुमारास ते आरएके मार्ग परिसरात नाकाबंदीच्या कारवाईत होते. त्याच दरम्यान रेल्वे पोलिस तेथे आले. त्यांनी, साधना शाळा कुठे आहे? अशी चौकशी केली. शाळेत कोणी भेटणार नसल्याचे सांगून नेमके काय काम होते याबाबत विचारणा करताच, त्यांनी सुटकेस मिस्ट्रीबाबत सांगितले.
सातपुते यांनी आपला मुलगाही मूकबधिर असून, साधना शाळेत शिकल्याचे सांगितले. सलग २० तास कर्तव्यावर असलेल्या सातपुते यांनी तत्काळ घरी व्हिडीओ कॉल करून मुलाला तयार होण्यास सांगितले आणि त्याच्यासह त्यांनी रेल्वे पोलिस ठाणे गाठले.
मी माझे कर्तव्य पार पाडले!
गौरव सातपुते याच्या मदतीने पोलिसांनी जय चावडाची चौकशी केली. मृत व्यक्ती कोण आहे? हत्या कुठे आणि कशी केली? या गुन्ह्यात आणखी कितीजण सामील आहेत? यांसह आरोपींची नावे, पुरावे, आदी तपशीलाचा उलगडा गौरवच्या मदतीने करण्यात आला. सातपुते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कर्तव्यनिष्ठेबद्दल संपूर्ण पोलिस दलात त्यांचे कौतुक होत आहे. याबद्दल सातपुते म्हणाले की, मी फक्त कर्तव्य पार पाडले.