सावधान! मुलांना मॅालमध्ये खेळायला नेण्याआधी हे वाचा; पालकांसमोरच चिमुकलीने सोडले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 06:56 AM2022-11-02T06:56:11+5:302022-11-02T06:56:21+5:30
मुंबईतील घटना
- मनीषा म्हात्रे
मुंबई : गेल्या काही दिवसात विविध मॉलच्या किड्स झोनमध्ये मुलांना खेळण्यासाठी नेण्याकडे पालकांबरोबर विविध शाळांचा कल वाढत आहे. मात्र, किड्स झोनमध्ये घसरगुंडी खेळत असताना तोल जाऊन खाली पडल्याने तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घाटकोपरमध्ये घडली आहे. त्यामुळे मुलांना किड्स झोनमध्ये खेळायला नेत असल्यास काळजी घेणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळकनगर परिसरात राहणारी दलीश करण वर्मा आई-वडिलांसोबत रविवारी घाटकोपर पूर्वेकडील नीलयोग मॉल येथे गेली होती. तेथे किड्स झोनमध्ये घसरगुंडीचा आनंद लुटत असताना ती खाली पडली. डोक्याला मार बसल्याने दलीश बेशुद्ध पडली. मेंदूत रक्तस्राव झाल्याचे आढळल्याने दलीशला मुलुंडच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले.
यापूर्वीच्या दुर्घटना
खिडकीतून खाली पडून चिमुकल्याचा मृत्यू
१० जुलै २०२२ : भायखळा येथील एका इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून पडून पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. घराच्या खिडकीलाच लागून असलेल्या बेडवर मुलगा छत्रीसोबत खेळत होता. खिडकीला ग्रील नसल्याने हातून सुटलेली छत्री घेण्यासाठी वाकला असताना खिडकीतून खाली पडला.
लिफ्टमध्ये अडकून मृत्यू
२८ नोव्हेंबर २०२० : धारावी येथील क्रॉसरोड परिसरात असलेल्या कोझी शेल्टर या सात मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या ५ वर्षीय मोहम्मद हुजेईफा सर्फराज शेख या मुलाचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला.
गच्चीतून पडून चिमुरडीने गमावला जीव
१२ मार्च २०१९ : लोकलच्या आवाजाच्या दिशेने खेळता खळता गच्चीपर्यंत पोहोचलेल्या दीड वर्षाच्या चिमुरडीचा तोल जाऊन ती खाली कोसळली. यातच तिचा मत्यू झाल्याची धक्कादायक घटना काळाचौकीमध्ये घडली. आरोही राणे असे चिमुरडीचे नाव आहे.