लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - मराठे उद्योग समूहातील तिसऱ्या पिढीचे उद्योजक यशवंत मराठे यांनी लिहिलेले ‘छपाई ते लेखणी’ हे पुस्तक वाचकांशी सहज सुसंवाद साधणारे आहे, लेखनशैली अत्यंत पारदर्शक आहे. तसेच महत्त्वाच्या विषयांना हात घालण्याचे धाडस त्य़ात दिसते. असेच लिखाण वाचकांना भावते, असे प्रतिपादन लेखक आणि उद्योजक जयराज साळगावकर यांनी केले.
उद्योजक यशवंत मराठे यांनी व्यावसायिक कार्य सांभाळतच ‘सरमिसळ’ नावाचे स्फूट लेखन केले. यात इतिहास, संस्कृती, चालू घडामोडी, तत्त्वज्ञान, आठवणी, व्यक्तिचित्रणे, प्रवासवर्णने, बालपणाच्या आठवणी अशा अनेकविध विषयांचा समावेश आहे. त्याचे संकलन असलेले ‘छपाई ते लेखणी’ हे पुस्तक ग्रंथालीने प्रकाशित केले आहे. त्याचे प्रकाशन प्रभादेवी येथील मराठे उद्योग भवनात जयराज साळगावकर, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूर यांच्या हस्ते झाले.
‘छपाई ते लेखणी’ ही साहित्यकृती नवसर्जन या निकषात बसणारी आहे. व्यक्तिचित्रणे हा या पुस्तकातील एक अत्यंत तरल आणि मनोज्ञ असा भाग आहे. प्रत्येक लेख हा वास्तववादी आणि अभ्यासपूर्ण असून लेखकाची चिकित्सक वृत्ती त्यातून दिसून येते, असे विचार सुधीर जोगळेकर यांनी व्यक्त केले.
उद्योगपती ते सामाजिक कार्य ते आता हौशी लेखक असा हा प्रवास आहे. सच्चेपणाने लिहिणे हे माझे ब्रीदवाक्य आहे. मनातील विचार कागदावर उतरवून मन हलके करत असतानाच ते कधी साहित्यात आणि पुस्तकरूपाने परावर्तित झाले, हे समजलेच नाही, त्यामुळे हे सारे काही नकळत आणि उत्स्फूर्तपणे होत गेले, असे विचार लेखक यशवंत मराठे यांनी व्यक्त केले. उत्तम साहित्यकृती प्रकाशित करणे हे ग्रंथालीचे वैशिष्ट्य असून, यशस्वी उद्योजकाचे चौफेर लेखन असे या पुस्तकाचे वर्णन करता येईल, हे साहित्य वाचकांपुढे सादर करून एक उत्तम साहित्यकृती वाचल्याचा अनुभव त्यांना नक्कीच येईल, असा विश्वास ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूर यांनी व्यक्त केला.