लॉकडाऊनच्या काळातही वाचनसंस्कृती वाढतेय घराघरांत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:06 AM2021-04-23T04:06:53+5:302021-04-23T04:06:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाने संपूर्ण जगाला आव्हान दिले आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊनची वेळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाने संपूर्ण जगाला आव्हान दिले आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊनची वेळ आली. अत्यावश्यक सेवावगळता सगळे बंद झाले. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी गदिमा म्हणतात, त्याप्रमाणे ‘जग हे बंदिशाला’ झालेले आहे. परंतु अशा परिस्थितीतही हा मिळालेला वेळ सत्कारणी लावण्यासाठी अनेकजण पुस्तक वाचनाकडे वळाल्याने कोरोनाच्या नकारात्मक काळातही पुस्तकांना चांगली मागणी असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे.
पुस्तकांची ऑनलाइन विक्री करणारी पोर्टल्स लॉकडाऊननंतर पुस्तकांची डिलिव्हरी करू शकत असल्याने ज्यांना पुस्तके वाचायची आहेत, त्यांना ई-बुक्सचा पर्याय निवडावा लागत आहे. त्यामुळे मराठी ई-बुक्सची विक्री सध्या काही प्रमाणात का होईना वाढली आहे. आपल्या आवडत्या लेखकापासून गाजलेल्या पुस्तकांपर्यंत आणि अनुवादित पुस्तकांपासून सेल्फ हेल्प प्रकारच्या पुस्तकांपर्यंत अनेक विषयांवरील मराठी ई-बुक्स सध्या वाचली जात असल्याने त्यांना सध्या चांगली पसंती मिळते आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेक मराठी प्रकाशकांची फेसबुक पेजेस चांगल्या प्रकारे सक्रिय झालेली दिसत आहेत. त्यावर वाचकांसाठी छापील पुस्तकांवर नवनव्या सवलत योजना जाहीर केल्या जात आहेत. संवेदना, नवचैतन्य, चपराक प्रकाशन, मेहता पब्लिशिंग हाउस या प्रकाशन संस्थांची याबाबतीतली कल्पकता वाखाणण्याजोगी आहे. या प्रकाशन संस्थांची छापील पुस्तके आणि ई-बुक्सही आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या सेलिब्रिटी लेखकांबरोबर लाइव्ह संवादांचे आयोजन केले जात आहे. लॉकडाऊन काळात लोकांचे डिजिटल वाचन वाढले असले तरी त्यामुळे छापील पुस्तकांची किंवा माध्यमाची वाढलेली मागणी हे चित्र वाचन संस्कृतीला उज्ज्वल भविष्यकाळ देणारे ठरेल, हे मात्र नक्की!
पुस्तकांशी मैत्री उत्साह प्रदान करते
वाचन हा एक संवाद आहे. लहान मुलांनी पुस्तकांचे वाचन हे मोठ्यानेच करायला हवे. यामुळे शब्दांच्या उच्चाराला धार येते आणि वेग वाढतो. कोरोनाकाळात वाचनाच्या आवडीसाठी ही पुस्तकेच येणारा प्रत्येक दिवस आनंद आणि उत्साह देतात. एकवेळ मित्र नसतील तर चालतील; पण पुस्तकांशी केलेली मैत्री कायम उत्साह प्रदान करते.
काळाप्रमाणे बदलली वाचनाची सवय
आज इंटरनेट, मोबाइलच्या या जमान्यात नव्या पिढीने पुस्तकांकडे जणू पाठच फिरवली आहे, अशी सगळीकडे ओरड असताना आज सगळ्यात जास्त पुस्तके ही तरुण आणि युवा वाचतात, फक्त त्यांची आवड ही बदलली आहे. सोशल मीडियावर अनेक तरुण व्यक्त होताना अनेक पुस्तकांचा संदर्भ देत असतात. काळाप्रमाणे वाचनाची सवय बदलली. आज पुस्तके घेऊन कमी प्रमाणात वाचली जातात कारण किण्डलवर पुस्तके वाचण्याचा जमाना आला आहे.
कोट :
लॉकडाऊनच्या काळातही पुस्तकांना बऱ्यापैकी मागणी आहे. ही नक्कीच सकारात्मक बाब आहे. ‘बुकगंगा’मुळे थेट वाचकांच्या हातात पुस्तक मिळते. त्यामुळे ऑनलाइन पुस्तकांच्या खरेदीला चांगला प्रतिसाद आहे.
- नितीन हिरवे, प्रकाशक, संवेदना प्रकाशन