राज चिंचणकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई- सर्वसामान्य महिलांना साहित्याच्या प्रांतात सामावून घेत, त्यांच्या मनात वाचन संस्कृतीचे रोपटे रुजवण्याचे कार्य अव्याहत सुरू ठेवणे, यासाठी सातत्य आणि चिकाटी हवी. 'विजया देव पुस्तक मंडळ' हे अगदी याच विचाराने झपाटलेले आहे. माहीममध्ये स्थित असलेले हे मंडळ महिलांच्या भावविश्वात वाचनसंस्कृतीची रुजवात करण्याचे महत्त्वाचे काम करत आहे.
उत्तम वाचक व लेखिका असलेल्या राधिका डोंगरे यांच्या मनात या मूळ संकल्पनेने फेर धरला आणि तिचे आता सार्वजनिक उपक्रमात रूपांतर झाले आहे.
राधिका डोंगरे यांनी, उत्तम वाचक असलेली त्यांची आई विजया देव यांच्या स्मृती जपण्यासाठी या मंडळाची मुहूर्तमेढ रोवली. पूर्णतः विनामूल्य तत्त्वावर, दर महिन्याला साहित्यिक उपक्रम राबवत त्यांनी या मंडळाचा डोलारा गेली पाच वर्षे आत्मविश्वासाने फुलवला आहे.
महिलांना एखाद्या पुस्तकावर बोलण्यासाठी विनाशुल्क व्यासपीठ देणे, हा या पुस्तक मंडळाचा मुख्य उद्देश आहे. पहिल्याच पुस्तक परीक्षण कार्यक्रमात 'हुमान' या पुस्तकावर सुमारे ३२ महिलांनी त्यांचे विचार मांडत या व्यासपीठाला उमेद मिळवून दिली. दर महिन्याला या उपक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहतात आणि वाचनसंस्कृतीची मनोभावे जोपासना करतात.
लॉकडाऊनच्या काळात खबरदारी म्हणून सव्वा वर्षे मंडळ बंद होते; मात्र गेल्या तीन महिन्यांपासून ऑनलाइनच्या माध्यमातून हे उपक्रम पुन्हा जोमाने सुरू झाले आहेत.
दर महिन्याला एक, असा पुस्तक परीक्षणाचा उपक्रम डिसेंबर २०१६ पासून या मंडळाने राबवला आहे. शक्य होईल तेव्हा त्या-त्या पुस्तकाचे लेखक, लेखिका, संपादक यांना आमंत्रित करून वाचनसंस्कृती वाढवण्याचा मंडळाचा प्रयत्नही यशस्वी झाला आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमात सहभाग घेतल्यामुळे अनेक महिला आता लिहित्या झाल्या आहेत. महिलांनी महिलांसाठी चालवलेले पुस्तक मंडळ म्हणून या उपक्रमाची दखल आता साहित्यविश्वात घेतली जात आहे.
चौकट:-
आय.सी.यू.मध्येही हातात पुस्तक...
माझी आई अखेरच्या दिवसांत रुग्णालयात आय.सी.यू.मध्ये होती. एकीकडे डायलिसिस सुरू असतानाही तिच्या हातात पुस्तक असायचे. तिथले डॉक्टर व स्टाफही म्हणायचा की, आय.सी.यू.मध्ये हातात पुस्तक धरणारा हा आमचा पहिला आणि बहुधा शेवटचा पेशंट असेल. आईच्या पश्चात कुठेतरी देणगी देण्यापेक्षा, वाचनसंस्कृती जोपासली जावी, या हेतूने हे मंडळ सुरू केले; अशी माहिती राधिका डोंगरे यांनी याविषयी बोलताना दिली.
सोबत : राधिका डोंगरे यांचा फोटो.