मुंबई - वाचनाने माणूस अधिक सुसंस्कृत आणि समृद्ध होतो. प्रत्येकाने नॅशनल लायब्ररी येथे दोन दिवसीय सुरू असलेल्या या ग्रंथ महोत्सवाला जरूर भेट द्यावी, असे आवाहन आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केले. दोन दिवस सुरू असणाऱ्या या ग्रंथ महोत्सवात वाचन प्रेमी ग्रंथ प्रेमी आणि सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे मुलुंड येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड यांनी कळवले आहे.
वांद्रे पश्चिम येथे नॅशनल लायब्ररीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगरतर्फे आयोजित ‘ग्रंथ महोत्सव २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मुंबई उपनगरचे आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते, मुंबई उपनगरचे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रमोद महाडिक, कोकण विभागाच्या प्रभारी सहाय्यक ग्रंथालय संचालक मंजुषा साळवे, राज्य ग्रंथालयाचे प्रशांत पाटील, अॅड. दीपक पडवळकर, मुंबई उपनगरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड उपस्थित होते.
काळाच्या ओघात वाचनाच्या पद्धती बदललेल्या आहेत. मात्र नवी पिढी आजही वाचनाशी जोडली गेली आहे, त्यामुळे या ग्रंथोत्सवाला आवर्जून भेट द्यावी जेणेकरुन आपल्या साहित्य संस्कृतीची माहिती मिळेल. ग्रंथ महोत्सवात विविध प्रकाशकांची पुस्तके देखील आहेत. कार्यक्रमापूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडीने महोत्सवाची सुरुवात झाली. शालेय विद्यार्थ्यांनी या ग्रंथदिंडीमध्ये सहभाग घेतला. यावेळी,. कोकण विभागाच्या प्रभारी सहाय्यक ग्रंथालय संचालक श्रीमती साळवे यांनी आभार मानले.
आज परिसंवाद, पथनाट्य आणि आनंदयात्रीचे सादरीकरण
५ मार्च रोजी 'प्रकाशन व्यवसायातील आव्हाने' या परिसंवादात डिम्पल प्रकाशनाचे अशोक मुळे, मॅजेस्टिक पब्लिशिंगचे अशोक कोठावळे, जयहिंद प्रकाशनचे हेमंत रायकर, ज्योत्स्ना प्रकाशनाचे विकास परांजपे आणि ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा सहभाग असेल. वाचन संस्कृती, सामाजिक बांधिलकी या विषयी चेतना महाविद्यालया तर्फे पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. अवयव दान काळाची गरज हे पुरुषोत्तम पवार सादर करणार आहेत. राकेश तळगावकर यांची संकल्पना असलेले मराठी साहित्यातील उत्तम व अभिजात पत्र साहित्यावर आधारित कार्यक्रम आहे. समारोपात वाचनाची आनंदयात्रा या कार्यक्रमाने होईल. यात ज्योती कपिले, विनम्र भाबल, तसेच महिला वाहतूक पोलीस कर्मचारी मेधा तामोरे आणि सुप्रिया रणधीर हे मनोगत व्यक्त करतील.