वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तकांच्या गावात ‘वाचनध्यास’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 04:05 AM2019-10-07T04:05:00+5:302019-10-07T04:05:02+5:30
वाचनध्यास उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे.
मुंबई : भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन, १५ आॅक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्त १२ व १३ आॅक्टोबर, २०१९ दरम्यान पुस्तकांच्या गावी, भिलार येथे ‘वाचनध्यास’ या सलग वाचनाच्या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी संचालक डॉ. आनंद काटीकर यांनी एका पत्रकाद्वारे दिली.
वाचनध्यास उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. सुमारे ५० चोखंदळ वाचकांना, आवडत्या साहित्य प्रकाराच्या पुस्तकघरात बसून सलग १० तास वाचनानंद घेण्याची संधी या उपक्रमाद्वारे मिळणार आहे. वाचन कौशल्यांचा विकास आणि वाचनसंस्कृतीचे संवर्धन या दोन्ही उद्दिष्टांना पूरक अशा या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी करणे अत्यावश्यक आहे. सहभागी संख्या मर्यादित असल्याने ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वानुसार सुमारे ५० सहभागींची नोंदणी केली जाणार आहे. या उपक्रमांतर्गत सुप्रसिद्ध साहित्यिक भारत सासणे वाचकांशी १३ आॅक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिनाविषयी अनौपचारिक संवादही साधणार आहेत, अशी माहिती डॉ. काटीकर यांनी दिली.
नोंदणीकृत वाचकांची निवास व भोजनाची व्यवस्था राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे. नोंदणीकृत वाचकांव्यतिरिक्त इतर वाचकही स्वखर्चाने या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. पुस्तक वाचनाच्या समृद्ध अनुभवासह भिलारवासीयांचे आदरातिथ्य आणि भिलारचे निसर्गसौंदर्य यांचाही अनुभव घेण्याची संधी सहभागींना मिळणार आहे. म्हणूनच पाचगणी, महाबळेश्वर, वाई, सातारा, पुणे परिसरातील वाचक पर्यटकांसह संपूर्ण राज्यातील पुस्तकप्रेमींनी, वाचकांनी या वाचनप्रेरक उपक्रमात आवर्जून सहभागी व्हावे, असे आग्रही आवाहन राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी संचालक डॉ. आनंद काटीकर यांनी केले.
विशेष अनुदानाची तरतूद
ग्रंथालये आणि वाचनकट्टे यांच्या माध्यमातून वाचनध्यास व अभिवाचन प्रकल्पाचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमांत सहभाग घेणाºया शासनमान्य ग्रंथालयांना वाचनध्यास आणि अभिवाचन अशा दोन्ही कार्यक्रमांच्या आयोजनासाठी राज्य मराठी विकास संस्थेकडून कमाल ५,००० रुपये इतके अनुदान देण्यात येईल. महाविद्यालये, साहित्य मंडळे, साहित्याची रुची असणारे साहित्यिक गट अशांनी अभिवाचन कट्ट्यांचे आयोजन केल्यास त्यांनाही कमाल ५,००० रुपये अनुदान देण्यात येईल. याबाबत संस्थेचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. आनंद काटीकर म्हणाले, स्थानिक ग्रंथालयांनी आपल्या ग्रंथालयातील पुस्तकांची वाचनकेंद्रे आपापल्या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी उभी करावीत, जेणेकरून सर्वसामान्य नागरिक त्या दिवशी वाचनाचा लाभ घेतील. या माध्यमातून वाचनसंस्कृती जपण्यासाठी निश्चितच हातभार लागू शकेल. या उपक्रमाबाबतचे सर्व नियम व अटी संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या गुगल अर्जात नमूद करण्यात आले आहेत. या उपक्रमात सहभागी होणाºया संस्थांनी हा अर्ज भरणे बंधनकारक आहे, याची नोंद घ्यावी.