Join us

पालिकेच्या सीबीएसईच्या १० शाळा प्रवेशांसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 4:07 AM

पालिकेच्या आणि गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षणाची संधी मिळण्याची तरतूदलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतील महापालिकेच्या १० शाळांमध्ये ...

पालिकेच्या आणि गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षणाची संधी मिळण्याची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईतील महापालिकेच्या १० शाळांमध्ये यापुढे सीबीएसई मंडळातील अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता येणार असून त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया काल २५ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. पालिका शिक्षण विभागाने २०२१-२२ वर्षात सीबीएसई पॅटर्ननुसार शिशुवर्ग ते सहावीपर्यंत प्रत्येक वर्गाची एक तुकडी सुरू करण्याचे ठरविले आहे. त्यात आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया १७ मार्चपर्यंत सुरू राहणार असून विद्यार्थी पालकांनी या शाळांमधील प्रवेशाला भविष्यातील दर्जात्मक शिक्षणाची संधी म्हणून पाहत प्रवेश घेण्याचे आवाहन शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनी केले आहे.

पालिकेकडून मुंबईत विविध ठिकाणी दहावीपर्यंतच्या शाळा चालवल्या जातात. त्याचवेळी, पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे ओढा वाढत चालला आहे. तर आर्थिकदृष्ट्या परवडत नसतानाही अनेक पालक सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतले जात आहे. पालिका शिक्षण विभागाने जोगेश्वरीतील पूनमनगर शाळेत यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर सुरू सीबीएसई शाळेस उत्तम प्रतिसाद लाभला आहे. त्या अनुभवाच्या आधारे पालिकेने इतर ठिकाणी सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा भाग लक्षात घेऊन पालिकेनेही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी १० ठिकाणी सीबीएसई शाळा सुरू करण्याचे ठरविले आहे. त्या विद्यार्थ्यांना पालिकेच्या इतर शाळाप्रमाणे सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत.

या नव्या शाळांमध्ये ४० विद्यार्थ्यांची तुकडी असणार असून १५ टक्के आरक्षणाप्रमाणे ६ जागा राखीव असणार असून ३४ जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने लॉटरी निघण्याची माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली आहे. प्रवेश प्रक्रियेत अर्ज केलेल्या शाळेमधील ३ किलोमीटर परिसरात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून शिशू वर्ग ते दुसरीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येऊन १० पर्यंत विद्यार्थी संख्येच्या पटानुसार वर्गसंख्येत वाढ होणार असल्याचेही पालकर यांनी सांगितले.

मराठी अनिवार्य

सीबीएसई बोर्डाच्या सुरू होणाऱ्या या नवीन शाळांमध्ये तृतीय भाषा म्हणून मराठी भाषा अनिवार्य असल्याचे संध्या दोशी यांनी नमूद केले. त्यामुळे मराठीची गळचेपी कुठेही होऊ दिली जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असे त्यांनी सांगितले.

या शाळांमध्ये केंद्रीय बोर्ड

दादर भवानी शंकर रोड मनपा शाळा, ॲन्टॉप हिल काणेनगर मनपा शाळा, प्रतीक्षा नगर मनपा शाळा, दिंडोशी मनपा शाळा, जनकल्याण नवीन इमारत मालाड, तुंगा व्हिलेज शाळा, विद्याविहार राजावाडी मनपा शाळा, चेंबूर अझीझ बाग मनपा शाळा, विक्रोळी हरियाली व्हिलेज मनपा शाळा, मुलूंड मिठागर शाळा.