राज्यभरात १२ कोटी खड्डे खोदून तयार!, हरित सेना झाली सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 05:43 AM2018-06-19T05:43:12+5:302018-06-19T05:43:12+5:30
राज्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी १ लाख २९ हजार २३७ स्थळांची नोंदणी वन विभागाच्या संकेतस्थळावर झाली आहे.
मुंबई : राज्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी १ लाख २९ हजार २३७ स्थळांची नोंदणी वन विभागाच्या संकेतस्थळावर झाली आहे. राज्यात २५ कोटी पेक्षा अधिक रोपं लागवडीसाठी उपलब्ध आहेत. १२ कोटी १० लाख खड्डे खोदून तयार आहेत. प्रत्येक व्यक्तीला रोपे मिळतील अशी व्यवस्था करण्यात आली असून ५२ लाखांहून अधिक लोकांची हरित सेना महाराष्ट्रात सज्ज झाली आहे.
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वनाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधला आणि जुलै महिन्यात होणाºया १३ कोटी वृक्ष लागवडीचा अंतिम आढावा घेतला. यावेळी नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वन विभागाचे सचिव विकास खारगे आदी अधिकारी उपस्थित होते.
पुढील वर्षी ३३ कोटी वृक्षलागवडीची मोहीम हाती घेतली जाईल असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, महात्मा गांधीजींनी १९३६ मध्ये सेवाग्राम येथे लावलेल्या पिंपळाच्या झाडाच्या सालीपासून कलमं तयार करून ही रोपं ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात २०६ शहीद स्मारकांमध्ये लावण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे.
औरंगाबाद विभागात ४३३ टेकड्यांवर वृक्ष लागवड होत असून प्रत्येक टेकडीसाठी आयुक्तांनी एक टेकडी अधिकारी नेमला असल्याचे त्यांनी सांगितले. पिंपळवन, बांबू वन, आॅक्सिजन पार्क, बेल वन, सीताफळ वन, आंबा वन, चिंच वन, नक्षत्र वन, वड-पिंपळ आणि कडुनिंबाचे त्रिमूर्ती वन अशी वने राज्यभरात विकसित केली जात आहेत. काही ठिकाणी फळझाड रोड, फुलबाग रोड, शोभिवंत वृक्ष रोड अशा नावीन्यपूर्ण कल्पना राबविल्या जात आहेत, नदीकाठी वृक्षलागवड होत आहे. जलसंपदा प्रकल्पाच्या काठाने वृक्ष लागवडीचे नियोजन झाले आहे. गोंदियात दुर्मिळ वृक्षप्रजातींची लागवड होत आहे. यवतमाळ मध्ये २५ एकरांवर आॅक्सीजन पार्क विकसित होत आहे. कुठे शुभेच्छा तर कुठे शुभमंगल वृक्ष लागत आहेत, कुठे गृहप्रवेश वृक्ष लागणार आहेत. कुठे तुतीची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. या सर्व कल्पना स्वागतार्ह असून निश्चित कौतूकास्पद आहेत असेही ते म्हणाले.
>राज्यपाल, मुख्यमंत्री आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत १३ कोटी वृक्ष लागवडीचा राज्यस्तरीय कार्यक्रम १ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा कोकण विभागाच्या आयुक्तांनी आणि जिल्हाधिकारी यांनी घ्यावा अशा सूचना देऊन मुनगंटीवार यांनी ३ आॅगस्ट २०१८ रोजी पुन्हा व्हिडिओ कॉन्फरंसिंगमध्ये आढावा आणि ३३ कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन यावर चर्चा होणार असल्याचे सांगितले.