मुंंबई : एसटी महामंडळातील गलथान कारभारामुळे एसटीची गाडी काहीशी मागे आली आहे. १९९० साली एसची स्थिती आणि २०१५ सालापासूनची एसटीची अवस्था यात खूप फरक पडला आहे. ज्यांचे चुकले आहे, त्यांच्या विरोधात जाईलच. महाविकास आघाडीचाही कोणता निर्णय चुकला, तर त्यांच्याही विरोधात रस्त्यावर येईन. एसटी कर्मचाऱ्यांसाठी कोणाशीही लढायला असून, त्यांना न्याय मिळवून देणारच, असे एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले.महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस संघटनेच्या वतीने मुंबई सेंट्रल शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. जगताप म्हणाले की, एसटीमध्ये शिवशाही सुरू केली. मात्र, ती ‘कोणासाठी’ असा सवाल उद्घाटनावेळीच उपस्थित केला होता. शिवशाहीला विरोधच होता. आता शिवशाहीची अवस्था काय झाली आहे? एसटीमध्ये अनेक चांगल्या योजना आणल्या गेल्या. मात्र, या योजना योग्यप्रकारे अंमलात आणल्या गेल्या नाहीत. महामंडळातील गलथान कारभारामुळे एसटीचे नुकसान होत आहे. अर्थसंकल्पातून एसटीला निधी मिळू शकेल, यासाठी राज्य शासनाचा दर्जा मिळण्यासाठी हरकत का आहे? महाविकास आघाडी सरकारने या मागणीचा विचार करावा, असे भाई जगताप म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांसाठी कोणाशीही लढायला तयार - भाई जगताप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 4:02 AM