खुशाल जेलमध्ये टाका, मी माझे काम करतच राहणार; वानखेडेंचं मलिकांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 08:57 AM2021-10-22T08:57:23+5:302021-10-22T08:57:57+5:30
जर देशाची सेवा करण्यासाठी आणि अमली पदार्थांविरोधात कारवाईवरून नवाब मलिक मला जेलमध्ये टाकणार असतील, तर मी त्याचे स्वागत करतो, अशा शब्दात एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई : जर देशाची सेवा करण्यासाठी आणि अमली पदार्थांविरोधात कारवाईवरून नवाब मलिक मला जेलमध्ये टाकणार असतील, तर मी त्याचे स्वागत करतो, अशा शब्दात एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सरकारची परवानगी घेऊन मी कुटुंबीयांसमवेत मालदीवला गेलो होतो. मलिक हे माझ्यावर खोटे आरोप करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही वानखेडे यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी वानखेडे, त्यांची बहीण यास्मिन वानखेडे यांचे मालदीव व दुबई येथील फोटो दाखवून कोरोनाच्या काळात ते बॉलिवूडच्या मंडळीकडील वसुलीसाठी लेडी डॉन समवेत गेले होते, असा आरोप केला. त्याला उत्तर देताना, गेल्या १५ दिवसांपासून कुटुंबीयांवर टीका केली जात आहे. त्यांना लोकांचा अपमान करण्याचा कदाचित अधिकार असू शकतो. पण मी खूप लहान सरकारी कर्मचारी आहे. मी देशसेवा करतच राहणार, अशी भूमिका मांडली.
मी दुबईत गेल्याची चुकीची माहिती आहे. जी तारीख मलिक सांगत आहेत तेव्हा, डिसेंबरमध्ये मी मुंबईत होतो. ते या गोष्टीची शहानिशा करू शकतात. त्यांनी ट्विट केलेले फोटो मुंबईचे आहेत. यास्मिन वानखेडे यांनीही मलिक यांच्या आरोपाचा इन्कार केला आहे. माझा भाऊ ड्रग्जविरोधात काम करत राहील. मलिक यांनी पुन्हा बिनबुडाचे आरोप केल्यास आपण त्यांची अनेक प्रकरणे बाहेर काढू.