मुंबई : अभ्युदयनगरमधील रहिवासी गिर्यारोहक वैभव एवळे यांनी आतापर्यंत केलेल्या विक्रमांची नोंद विविध रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने शुक्रवारी सुप्रसिद्ध समाजसेवक प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते हेमलकसा येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना मानाचा पुरस्कार देण्यात आला. आशिया बुक आॅफ रेकॉर्ड, इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड, हाई रेंज बुक आॅफ रेकॉर्ड आणि इनक्रेडीबल बुक आॅफ रेकॉर्डमध्ये एवळे यांनी केलेल्या विक्रमांची नोंद झाली आहे. या वर्षी वैभव एवळे हे आॅस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर ‘माउंट कोसचिऊसजको’ सर करण्यास सज्ज झाले आहेत.
येत्या १५ आॅगस्ट रोजी आॅस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर ‘माउंट कोसचिऊसजको’ सर करून ते ७४वा स्वतंत्रता दिवस साजरा करणात आहेत. या वेळी ७४ भारतीय ध्वजांचे तोरण तेथे फडकावून आणि राष्ट्रगीत गाऊन स्वतंत्रता दिवस साजरा करण्याचा त्यांचा मानस आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक सामाजिक मोहिमा त्यांनी राबविल्या आहेत. या मोहिमेसाठी समाजसेवक प्रकाश आमटे यांनी भरभरून शुभेच्छा दिल्याचे गिर्यारोहक वैभव एवळे यांनी सांगितले.
१५ आॅगस्ट २०१८ रोजी ७२व्या स्वतंत्रता दिनानिमित्त आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमंजारो सर करून ७२ भारतीय ध्वजांचे तोरण तेथे फडकावून विक्रम केला होता. याची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. याशिवाय १५ आॅगस्ट २०१९ रोजी ७३व्या स्वतंत्रता दिनी गिर्यारोहक वैभव एवळे आणि नीलेश माने यांनी युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रस सर करून ७३ भारतीय ध्वजांचे तोरण फडकावून आणि राष्ट्रगीत गाऊन विश्वविक्रम केला होता.