मुंबई :मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने रेडिमिक्स काँक्रीट प्लांटवर कारवाईचा बडगा उगारला असला तरी अद्यापही उपनगरातील बहुतांशी ठिकाणी हे आरएमसी प्लांट डोकेदुखी ठरत आहेत. या प्लांटमधून होणारे प्रदूषण तापदायक ठरत असतानाच या प्लांटमधून वाहणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावरची माती उडण्यासोबतच रस्ते खराब होत आहेत.
दहीसर पूर्वेकडील शांतीनगर डोंगरी परिसरातील आरएमसी प्लांट नागरिकांना तापदायक ठरत असून, येथून उठणाऱ्या धुळीमुळे स्थानिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. प्लांटच्या परिसरात असणारी वस्ती, शाळा यांनाही याचा त्रास होत आहे. शिवाय प्लांटमधून ये-जा करणारी वाहने बाजार परिसरातून वाहत असल्याने नागरिकांना त्याचा अधिकच त्रास होत आहे, असे दहीसर येथील नित्यानंद हिरवे यांनी सांगितले. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळासह पालिकेकडे तक्रार करण्यात आली आहे.
टँकर्सच्या वाहतुकीमुळे धूळ त्रासदायक :
कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजारातील वाडिया कॉलनीमधील रस्ताही आरएमसी प्लांटमधून ये-जा करणाऱ्या टँकर्समुळे खराब झाला आहे. रस्त्यावर खड्डे पडल्यानंतर पालिकेने त्याची कितीही दुरुस्ती केली तरी रस्त्याची अवस्था जैसे थै तैसे होत आहे. शिवाय टँकर्सच्या वाहतुकीमुळे बाजारातल्या रस्त्यावरून उडणारी धूळ त्रासदायक ठरत असल्याचे स्थानिक रहिवासी ॲड. राकेश पाटील यांनी सांगितले.
मुंबईत पुन्हा प्रदूषणाने डोके काढले वर :
प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या आरएमसीवर मंडळाने महिनाभरात मोठ्या प्रमाणावर कारवाई करत नोटीस दिली होती. मात्र, त्यानंतर कारवाई थंड पडल्याचे चित्र असून, मुंबईतले कमी झालेले प्रदूषण पुन्हा डोके वर काढू लागले आहे.