नवी मुंबई : नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. नवी मुंबईमध्ये सोसायट्या, इमारतीच्या गच्चीवर ओली पार्टी आयोजित केल्यास अडचणीत येण्य़ाची शक्य़ता आहे. कारण, या पार्ट्यांना पोलिसांची परवानगी न घेतल्यास कारवाई करण्यात येणार आहे. असे आदेशच नवी मुंबई पोलिसांनी जारी केला आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. पब, बार याबरोबरच सोसायट्याही ओल्या पार्ट्यांचे आयोजन करण्य़ात येते. यावेळी आगी लागण्याच्या घटना किंवा वादाच्या घटना घडतात. यामुळे यंदा नवी मुंबई पोलिसांनी नवीन आदेश काढत सोसायट्या किंवा गच्चीवर पार्टीचे आयोजन केले असल्यास व पोलिसांची परवानगी घेतलेली नसल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
सोसायट्य़ांनी अशा पार्ट्या करताना पोलिसांची परवानगी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. शिवाय डीजेला परवानगी नसली तरीही छोटे स्पिकर लावण्यावर न्यायालयाने कोणतीही बंदी घातलेली नाही. मात्र, असे स्पिकर पुरविणारे नोंदणीकृत असायला हवे अशी अटही पोलिसांनी घातली आहे.
मद्य पिऊन वाहने चालवू नका!दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांवर पोलिस कठोर कारवाई करणार असून बार चालकांनी त्यांच्या ग्राहकांना घरपोच सोडण्याची सोय करावी असा आदेशही देण्य़ात आला आहे.