Baba Siddique Kamaal R. Khan: बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने मुंबईत खळबळ उडाली आहे. त्यांच्या हत्येने कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दाही ज्वलंत बनला आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची वेगवेगळी कारणे चर्चेत आहे. एसआरए प्रोजेक्टमधून त्यांची हत्या केली गेली, असेही बोलले जात आहे. आता केआरकेने (कमाल आर खान) केलेल्या काही ट्विटने रिअल इस्टेट कनेक्शनमधून सिद्दिकींची हत्या झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अभिनेता, चित्रपट समिक्षक असलेल्या केआरकेने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर एक पोस्ट केली आहे. केआरकेने आधी बाबा सिद्धिकींवर टीका करणारे ट्विट केले आहे.
"जशी करणी, तशी भरणी. माहिती नाही किती लोकांच्या जागा जबरदस्तीने हडपल्या होत्या. कुत्र्यासारखा मृत्यू झाला. आज त्या सगळ्या पिडलेल्या लोकांना दिलासा मिळाला असेल", असे केआरकेने त्यांच्या एका पोस्ट म्हटले आहे.
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे दाऊद गँग?
केआरकेने दुसरी एक पोस्ट केली आहे. ज्यात त्याने बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे दाऊद कनेक्शन असल्याचा उल्लेख केला आहे.
"डी कंपनीने बाबा सिद्दिकी यांना २०१३ मध्ये धमकी दिली होती आणि एक भूखंड खाली करायला सांगितलं होतं. हा भूखंड त्यांनी हिरावून घेतला होता. बाबाने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली होती आणि त्यांना पोलीस सुरक्षाही मिळाली होती. अनेक भूखंड हडपल्याच्या प्रकरणात बाबा सिद्धिकी आरोपी होते. वृत्तांनुसार डी गँगने त्यांना कारणांमुळे संपवले असेल. ते काही प्रॉपर्टी सोडत नसल्यान किंवा डी गँग मुंबईत कुणालाही संपवू शकते, हे सिद्ध करण्यासाठी हे केलं असेल", असे केआरकेने म्हटले आहे.
बाबा सिद्दिकींचे बॉलिवूड कनेक्शन
१९९० आणि २००० च्या दशकात बॉलिवूडचा जागतिक स्तरावर विस्तार होत असताना, बाबा सिद्दिकी यांचे बॉलिवूडशी घनिष्ठ संबंध वाढले. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत असलेली त्यांची मैत्री त्यांना विविध हाय-प्रोफाईल इव्हेंट्समध्ये प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व बनवणारी ठरली. त्यांच्या इफ्तार पार्ट्या बॉलिवूडच्या नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध होत्या.
मुंबईतील रिअल इस्टेट उद्योगातही बाबा सिद्दिकींचा प्रभाव होता. बांद्रा पश्चिम हा भाग मुंबईतील सर्वात महागड्या रिअल इस्टेट मार्केट्सपैकी एक बनत असताना, सिद्दिकींनी आपल्या राजकीय संबंधांच्या मदतीने बांधकाम लॉबीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. आता बाबा सिद्दिकींच्या हत्येचा संबंध एसआरए प्रोजेक्टशी जोडला गेला आहे.